स्थलांतरित होणारे पक्षी इंग्रजी V आकारात का उडतात, याची शास्त्रीय कारणे तर जाणून घ्या!!

स्थलांतरित होणारे पक्षी इंग्रजी V आकारात का उडतात, याची शास्त्रीय कारणे तर जाणून घ्या!!

तुम्ही स्थलांतरीत होणारे पक्षी उडताना पहिले आहेत का? हे सर्व पक्षी एका विशिष्ट आकारात उडत असतात. आकाशात उडणारे हे पक्षी इंग्रजी V आकारात उडतात. हे असे का उडतात हा प्रश्न तुम्हाला बऱ्याचदा पडला असेल. आज आपण या मागचे शास्त्रीय कारण समजून घेऊयात.

अशा खास आकारात पक्षी उडण्याची दोन कारणे आहेत. एक म्हणजे ते आपली उर्जा वाचवतात. जेव्हा पक्षी आपले पंख फडफडवतो तेव्हा त्याच्या पंखांच्या टोकातून व्हर्लपूल किंवा टॉर्नेडोसारख्या लाटा निर्माण होतात. या लहरींच्या मागे असलेली हवा खाली जाते आणि त्यांच्या बाजूची हवा नेहमीच वर येते. जेव्हा दुसरा पक्षी वाढत्या हवेच्या क्षेत्रात उडतो तेव्हा त्याला उडण्यासाठी कमी ताकद लावावी लागते. अशाप्रकारे कळपात उडणारे सर्व पक्षी एकमेकांशी एकरूप होऊन या आकारात उडतात आणि आपली ऊर्जा वाचवतात. व्ही फॉर्मेशनमध्ये, काही पक्षी डावीकडे, काही उजवीकडे आणि काही मध्यभागी उडण्यास प्राधान्य देतात.

आणि दुसरे कारण म्हणजे पक्ष्यांचे डोळे बाजूला असल्यामुळे, हा व्ही पॅटर्न पक्ष्यांना संपूर्ण गटाचा मागोवा ठेवण्यास मदत करतो आणि त्यांना उड्डाणाची दिशा अधिक सहजतेने समजते. अशा रीतीने पाठीमागून उडणाऱ्या पक्ष्यांना सोपे जाते. तसेच, पक्ष्यांवर केलेल्या संशोधनातून असे दिसून आले आहे की या आकाराच्या पक्ष्यांची हृदय गती समोरून उडणाऱ्या पक्ष्यांपेक्षा कमी असते. अशा प्रकारे हजारो किलोमीटर अंतरावरून उडणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांना सहज उडता येते. समोरचे पक्षी थकले की मागे जातात आणि मागचे पक्षी त्यांची जागा घेतात.

याच पक्ष्यांचे अनुसरण लष्करी विमाने करतात. तुम्ही एअर शो पाहिले असतील तर त्यातही विमाने गटातटांत उडवली जातात. ती ही 'व्ही फॉर्मेशन' मध्येच उडतात. यामागचे कारणही तेच असते.

शीतल दरंदळे