आज आम्ही एक अशी गोष्ट सांगणार आहोत जी क्वचितच तुम्ही कधी ऐकली असेल. खरं तर या कथेचा कोणताही लेखी पुरावा उपलब्ध नाही. पण ही कथा अनेक वर्षांपासून त्रावणकोरमध्ये सांगितली जाते आणि तिचा आजही अभिमान बाळगला जातो. अन्यायाविरुद्ध उचललेलं पाऊल आणि त्याची मोजावी लागलेली किंमत हे या कथेतून दिसतं.
ही कथा ब्रिटीश राजवटीमधली आहे. चेन्नई जसं आज त्याच्या सर्वाधिक शैक्षणिक स्तरासाठी ओळखलं जातं, तसं त्याकाळात नव्हतं. तिथल्या मातीत आणि माणसांमध्ये जाती व्यवस्था, वर्णभेद खोलवर रुजला होता. याच जातीपातीच्या बळीची ही कहाणी.

नांगेली आणि तिचा पती चीरुकंदन हे एझवा जातीचे होते. चेन्नईच्या त्रावणकोर भागात ते राहायचे. त्यांच्या गावाला ‘मुलाच्छीपुरम’ म्हणजे स्तन असणाऱ्या स्त्रियांचा प्रदेश म्हणून ओळखलं जायचं. या भागातल्या राजाचे कायदे जाती व्यवस्थेशी निगडीत होते. म्हणजे समजा, एक कोळी आहे आणि त्याच्याकडे त्याच्या मालकीचं फक्त त्याचं मासे पकडण्याचं जाळं आहे. तर त्याच्या त्या जाळ्यावर टॅक्स लावण्यात येत असे. जर एखाद्या माणसाच्या बहारदार मिश्या असतील तर त्याच्या मिशांवर देखील टॅक्स लागायचा. याच गावातील आणखी एक संतापजनक टॅक्स म्हणजे दलित स्त्रियांच्या स्तनांवर लागलेला टॅक्स.
दलित स्त्रियांना त्यांचे स्तन झाकण्यासाठी त्यांना टॅक्स द्यावा लागायचा. या टॅक्सपासून नांगेलीसुद्धा सुटली नव्हती. पण एक दिवस वर्षानुवर्षे चालत आलेला हा कायदा मोडायला ती निघाली. तिने टॅक्स न भरताच स्तन झाकायला सुरुवात केली. जेव्हा हे राजाच्या माणसांना समजलं, तेव्हा ते तिच्याकडे टॅक्स मागण्यासाठी आले. तेव्हा ती शांतपणे घरात गेली आणि तिने केळीच्या पानात काही तरी झाकून आणले. राजाच्या माणसाने जेव्हा त्या पानात काय आहे हे बघितलं तेव्हा त्यांना धक्काच बसला. त्यात चक्क नांगेलीने आपले स्तन कापून ठेवले होते. या अमानुष कायद्याविरुद्ध तिने हे पाऊल उचललं होतं. ही घटना घडली ते साल होते १८०३.

नांगेलीने बंड केले, पण तिचा प्राण वाचू शकला नाही. थोड्याच वेळात ती अतिरक्तस्त्रावाने मेली. असं म्हणतात की तिचा पती चीरुकंदनने तिच्या चितेवर उडी घेऊन स्वतःला संपवलं. ही कथा इथेच संपत नाही. नांगेलीचा जीव गेला, पण तिने ही व्यवस्था मोडून काढली. राजाला हा कायदा रद्दबादल करावा लागला.
नांगेलीला मुलबाळ नव्हतं. या घटनेनंतर तिचे गावातील नातेवाईक गाव सोडून निघून गेले. ते आजही आसपासच्या गावात राहतात. त्यांना या घटनेचा सार्थ अभिमान आहे. तिच्या नातेवाईकांनी तिला इतिहासात स्थान मिळावं म्हणून मागणी केली आहे.
नांगेलीचा उल्लेख कुठेच नसला तरी मुरली टी यांनी 'Amana - The Hidden Picture of History' या आपल्या पुस्तकात तिला चित्ररूप देऊन कायमचं सामील करून घेतलं आहे.
अशा या वीरांगनेला बोभाटाचा सलाम!!
