रशिया-युक्रेन युद्धाने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे. लवकरच हे युद्ध थांबावं आणि जगावरील तिसऱ्या महायुद्धाचं संकट टाळावं अशी अनेकांची इच्छा असताना, या युद्धात परदेशी योद्धेही आपले योगदान देण्यासाठी उतरले आहेत.
रशियासारख्या बलाढ्य आणि ताकदवान राष्ट्रापुढं युक्रेनचा निभाव लागणं कठीण दिसत आहे. एकीकडे युक्रेन रशियाशी शांती प्रस्तावावर चर्चा करण्यास उत्सुक असला तरी, रशिया इतक्यात युद्धाला पूर्णविराम देईल अशी चिन्हं सध्या तरी दिसत नाहीत. अशा पार्श्वभूमीवर युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी देशोदेशीच्या योद्ध्यांना आपल्या लष्करात सामील होऊन आपल्याला या युद्धात सहकार्य करावं अशी विनंती केली होती.
युक्रेनमधील हाहाकार पाहून जगभरातील अनेक योद्धे झेलेन्स्कींच्या विनंतीचा मान राखत या युद्धात सहभागी होत आहेत. या सगळ्यात सध्या जोरात चर्चा सुरू आहे ती नेमबाज वालीची. नेमबाज वाली हा कॅनडियन सैनिक आहे आणि नेमबाजीत सध्या तरी त्याचा हात कुणीच धरू शकत नाही. वालीसारखा एक निष्णात नेमबाज युक्रेनच्या बाजूने या युद्धात उतरल्याने युक्रेनला थोडाफार दिलासा नक्कीच मिळाला असेल. पण म्हणूनच युक्रेनचे मनोधैर्य खच्ची करण्यासाठी त्याच्या मृत्यूच्या बातम्याही रशियन सूत्रांकडून काही दिवसांपूर्वी प्रसारित केल्या होत्या. अजून यातलं खरं-खोटं काही सिद्ध झालं नसलं तरी आज जगातल्या सर्वात खतरनाक म्हणून ओळखला जाणाऱ्या या वाली नेमबाजाविषयी अधिक माहिती जाणून घेऊया.


