सावजी ढोलकीया हे नाव तसे भारताला नवे नाही. काही वर्षांपूर्वी आपल्या कंपनीतील कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस म्हणून घरे आणि कार दिली म्हणून त्यांचे नाव देशभर चर्चेत आले होते. तब्बल ५०० कार्स आणि २८० घरे देणे ही काही साधी गोष्ट नाही. सावजी ढोलकीया हे जितके मोठे उद्योगपती आहेत, तितकेच मोठे त्यांचे सामाजिक कार्य आहे.
नुकतेच त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविले होते. सावजींचे नाव आता परत बातम्यात झळकत आहे. कारण आहे - त्यांनी आपले आपले ५० कोटी किंमतीचे हेलिकॉप्टर सुरत शहरातील आरोग्य आणि इतर गोष्टींच्या वापरासाठी दान केले आहे.
स्वतःच्या हेलिकॉप्टरमधून फिरणे हे प्रत्येक उद्योगपतीचे स्वप्न असते. एक स्टेटस सिम्बॉल म्हणूनही याला विशेष महत्व आहे. पण या सर्व प्रलोभनांचा त्याग करून त्यानी हे हेलिकॉप्टर दान करण्याचा निर्णय घेतला आहे. हे हेलिकॉप्टर त्यांना गिफ्ट म्हणून मिळाले होते. स्वतःकडे हेलिकॉप्टर ठेऊन मिरवण्यापेक्षा गोरगरीब जनतेला याचा फायदा व्हावा हा विचार त्यांनी केला.
सावजी गर्भश्रीमंत नाहीत. प्रचंड मेहनतीने ते या स्थानावर पोचले आहेत. १९७७ साली अवघे १२ रुपये घेऊन ते सुरतेला आले आणि हिरा उद्योगात कर्मचारी म्हणून कामास सुरुवात केली. त्यांनी प्रचंड मेहनत करून १९९२ साली स्वतःचा हिरा व्यवसाय सुरू केला. आज हा उद्योग इतका पसरला आहे की त्यांच्याकडे तब्बल ५५०० कर्मचारी काम करतात. त्यांचा वार्षिक टर्नओव्हर हा ६ हजार कोटींपेक्षा अधिक आहे.
सावजी यांच्या कंपनीकडून तयार केले जाणारे हिरे अमेरिका, चीनसहित जगभरातील ५० कंपन्यांमध्ये निर्यात केले जात असतात. सावजी यांनी सौराष्ट्र भागातील त्यांच्या मूळ गावी कोरडवाहू जमीन मोठ्या प्रमाणावर आहे हे बघून तिथे त्यांनी ७५ पेक्षा जास्त तलाव निर्माण केले आहेत. यातून मोठ्या भागाचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे.
सावजी हे शून्यातून श्रीमंत झालेले उद्योगपती आहेत, म्हणून त्यांनी आपले सामाजिक कर्तव्य समजून आजवर अनेक कामे केली आहेत, हेलिकॉप्टर दान करणे हे खचितच साधी गोष्ट नाही. त्यांच्या या स्वभावामुळे गुजरातसहित संपूर्ण देशात त्यांच्याबद्दल आदर आहे.
उदय पाटील
