अमेरिकेमध्ये बराक ओबामा यांच्यासारखी आफ्रिकन अमेरिकन व्यक्ती स्वतःच्या गुणवत्तेवर थेट राष्ट्राध्यक्षपदापर्यंत पोहोचू शकते हे अमेरिकेतील वर्णभेद संपुष्टात आल्याचं द्योतक आहे. पण पूर्वी मात्र अशी स्थिती नव्हती. अमेरिकेतील यादवी युद्ध (सिव्हील वॉर)नंतर अमेरिकेला एक अजून कुप्रथा हद्दपार करायची होती. ही प्रथा म्हणजे वर्णभेद- गोरे आणि काळे यांच्यात केला जाणारा भेदभाव.
पूर्वी अमेरिकेत काळ्या लोकांना मुख्यतः काम करण्यासाठी, गुलाम म्हणून आणलं जाई. त्यांना कोणतेही अधिकार नव्हते. पदोपदी अपमानास्पद वागणूक दिली जाई. त्यांची स्वच्छतागृहं, त्यांच्या वस्त्या, चर्च सगळं स्वतंत्र असायचं. अगदी बसमध्येही त्यांच्या जागा शेवटी असत. त्याचवेळी कुणी गोरी व्यक्ती उभी असेल तर तिला आपली जागा द्यावी लागे. 'हिडन फिगर्स' या चित्रपटात काळ्या वा निग्रो लोकांच्या तत्कालीन परिस्थितीचं यथार्थ वर्णन केलं आहे. थोडक्यात त्याकाळी सगळे अधिकार, कायदे हे गोऱ्या लोकांच्या बाजूने होते. पण कुठे ना कुठे चुकीच्या, अमानुष गोष्टींना विरोध केला जातोच. असाच विरोध डिसेंबर १९५५ मध्ये मॉंटेंगोमेरी या ठिकाणी झाला. निमित्त होतं बसमध्ये गोऱ्या माणसासाठी जागेवरून उठायला नकार देण्याचं. नकार देणारी व्यक्ती नागरी चळवळीतील कार्यकर्ती होती. या नकारासाठी त्याला अटक करण्यात आली. ही बातमी सगळीकडे पसरून त्याचा उद्रेक झाला. कृष्णवर्णीय लोकांनी 'बस बॉयकॉट' नावाचं आंदोलन सुरू केलं. कोणाच्याही ध्यानीमनी नसताना या आंदोलनाचं नेतृत्व धार्मिक कुटुंबात वाढलेल्या मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर या तरुणाकडे आलं.



