आपल्या शरीरातील अवयव तसे शांतताप्रेमी म्हणायचे. त्यांना नेमून दिलेली कामं ते कुरकुर न करता बिनबोभाट पार पाडत असतात. ह्या सगळ्या शांततामय वातावरणात एक असा अवयव आहे, जो आपलं कार्य कधी संथ गतीने चालतो,तर कधी जलदगतीने! कधी शांतपणे, तर कधी धडधडत जाणाऱ्या ट्रेनप्रमाणे. क्रिकेटच्या मॅचचा थरार अनुभवताना खास मैत्रीणीला प्रपोज करताना देखील तुम्हांला हाच अनुभव आला असेल. जीवनात असे अनेक प्रसंग येतात, जेव्हा ह्या अवयवाचं अस्तित्व प्रकर्षाने जाणवतं. थोडक्यात सांगायचं तर आज आम्ही तुम्हाला 'दिल की धडकन 'म्हणजे हृदयाच्या नियमित आणि अनियमित धडधडण्याविषयी सांगणार आहोत.
आपलं हृदय विशिष्ट लयीत -तालबध्द रितीने- सतत आकुंचन व प्रसरण पावत असते. आपल्या नेहेमीच्या भाषेत आपण त्याला 'पल्स रेट' असं म्हणतो. सर्वसाधारण प्रौढ व्यक्तिचा 'पल्स रेट' मिनिटाला ६० ते १०० ठोके असतो. शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणाऱ्या तरुणांमध्ये कमी ठोके ही सामान्य बाब असू शकते. व्यायाम, वेदना आणि राग यामुळे एखाद्या व्यक्तीच्या हृदयाची गती बदलते. या लय म्हणजे रिदममध्ये पडणार्या फरकाला किंवा बदलाला वैद्यकीय परिभाषेत वेगवेगळी नावे आहेत. हृदयाची गती वेगवान असते तेव्हां त्याला वैद्यकीय भाषेत टॅकीकार्डिया, आणि धीमी असेल तर ब्रॅडीकार्डिया म्हणतात.








