रशियातले सत्ताविरोधी नेते ॲलेक्सी नेवाल्नी १६ फेब्रुवारीला उत्तर रशियातल्या वैराण अती थंड तुरुंगात वारले.
रक्तात गुठळी झाल्यामुळं गेले असं सरकारनं सांगितलं. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं की गुठळ्या होण्याची व्याधी त्यांना नव्हती. पाझरलेल्या बातमीनुसार नेवाल्नीना हळूहळू प्रभावी ठरणारं विष दिलं होतं, म्हणूनच त्यांचं शव नातेवाईकांच्या हवाली करायला सरकारनं नकार दिला.
तुरुंगातल्या लोकांनी सांगितलं की दुपारी फिरायला गेले असताना ते कोसळले आणि उपचारांचा उपयोग झाला नाही.
नेवाल्नी दररोज सकाळी सहा वाजता फिरायला जात असत. तुरुंगाचा तो नियमच होता. मग दुपारी ते बाहेर कां पडले या प्रश्नाचं उत्तर द्यायला रशियन सरकार तयार नाही.
अमेरिका, जर्मनी, फ्रान्स इत्यादी देशांच्या प्रमुखांनी जाहीर केलंय की नेवाल्नी यांच्या मृत्यूला रशियाचे प्रेसिडेंट पुतिन जबाबदार आहेत.
ही झाली मुत्सद्दी भाषा. सामान्य माणसाच्या भाषेत पुतिन यांनी नेवाल्नी यांचा खून केला आहे. तसा आरोप रशियातल्या खूप लोकांनी केला आहे.
नेवाल्नींना पुतिननी अतिरेकी असा शिक्का मारून तुरुंगात ढकललं होतं. बोगस न्यायालयातल्या बोगस न्यायमूर्तींनी पोलिस ठाण्यात कोर्ट भरवून नेवाल्नीना १९ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा दिली होती.
नेवाल्नींनी अनेक वेळा तुरुंगाची हवा खाल्ली होती. त्यांचा जीव घेणारा आणि शेवटला तुरुंगवास २०२१ सालच्या जानेवारी महिन्यात सुरु झाला. १७ जानेवारीला ते बर्लीनहून परतले ते तुरुंगातच पोचले.



