दुसरे महायुद्ध संपले. वरकरणी त्याला पूर्णविराम मिळाला. पण रशिया आणि अमेरिका यांच्यातील शीतयुद्ध संपले नव्हते. एकमेकांना शह देण्यासाठी या दोन्ही देशांनी हरेक क्षेत्रात इर्षा केली. सोव्हिएतने स्फुटनिक उपग्रह अवकाशात सोडल्यानंतर लगेचच अमेरिकेनेही अवकाश मोहिमेची तयारी केली. अवकाश संशोधन असे गोंडस नाव देण्यात आले असले तरी अवकाशातून रशिया आपल्या देशावर नजर तर ठेवून नाही ना याचा शोध घेण्यासाठीच अमेरिकेने अवकाश मोहिमा आखल्या असे म्हटले जाते. अंतराळ मोहिमेपासून ते अण्वस्त्रांचा ताफा बनवण्यापर्यंत दोन्ही देश एकमेकांशी इर्षा करण्यात तसूभरही कमी पडत नव्हते.
अशातच सोव्हिएतने भूगार्भाचे रहस्य जाणून घेण्यासाठी म्हणून पृथ्वीच्या पृष्ट्भागापासून तिच्या केंद्रबिंदूपर्यंत एक खड्डा खणण्याचे ठरवले. अवकाशाचे रहस्य तर उलगडत होतेच, पण पृथ्वीच्या पोटात काय आहे, याचे कुतूहल शास्त्रज्ञांना स्वस्थ बसू देत नव्हते. म्हणूनच रशिया आणि नॉर्वेच्या सीमेवरील एक दुर्गम ठिकाण निवडून तिथून पृथ्वीच्या पोटात शिरण्यासाठी मार्ग बनवण्याचे ठरवण्यात आले. २४ मे १९७० रोजी पासून या मोहिमेचा शुभारंभ झाला. अक्षरश: अब्जावधी रुपयांचा चुराडा करून पृथ्वीच्या पोटात १२ किमी लांबीचा खड्डा खोदण्यात आला. जसजसे आत जाईल तसतसे पृथ्वीचे थर समजत गेले. लाखो वर्षांच्या इतिहासाचे एकेक पदर उलगडत गेले. लाखो वर्षापूर्वीपासून या पृथ्वीमाईने आपल्या पोटात काय काय साठवून ठेवले आहे हेही उलगडत गेले. सोने, तांबे आणि निकेलचे साठेही सापडले. या खणण्याचा काहीच फायदा झाला नाही असे नाही, पण ठोस असे काहीच हाती लागले नाही. शेवटी १२ किमी अंतरावर पृथ्वीचे तापमान १८००डिग्रीच्याही पुढे गेल्यानंतर आणखी खोल खणणे अशक्य झाले. या तापमानावर कोणतेच तंत्रज्ञान काम करत नव्हते. त्यामुळे शेवटी १९९२ मध्ये हा प्रकल्प बंद करण्यात आला.



