प्रवास करताना किंवा रोजच्या रोज मोटरसायकल किंवा कार चालवत असताना वाहतुकीचे नियम पाळणे गरजेचे असते. नियमबाह्य वर्तवणूक केली तर ट्रॅफिक दंडाचा फटका बसून खिशाला चांगलाच भुर्दंड बसतो. याचा अनुभव लोकांना वेळोवेळी येत असतो. अनेकवेळेस हेल्मेटसक्तीमुळे पण अनेकांना दंड भरावा लागला आहे. पण ट्रॅफिक नियम समजून न घेताच जर रस्त्यावर फिरले तर हेल्मेटअसून पण दोन हजार रुपयांचा फटका बसू शकतो. तो कसा ते समजून घेऊया.
मोटारसायकल चालवत असताना हेल्मेट आहे म्हणून निश्चित असण्याची गरज नाही. हेल्मेट आहे पण त्याची स्ट्रीप लावली नाही या एका कारणावरून तुम्हाला हजार रुपयांचा दंड बसू शकतो. मोटर व्हेईकल ऍक्ट १९४D नुसार तसा स्पष्ट नियम आहे. तसेच तुम्ही जर BIS नसलेला हेल्मेट वापरत असाल तर त्याच मोटर व्हेईकल ऍक्ट १९४D नुसार हजार रुपयांचा दंड आहे. म्हणजेच या दोन गोष्टी व्यवस्थित नसतील तर दोन हजार रुपये भरण्याची तयारी ठेवावी लागेल.
दोन वर्षांपूर्वी सरकारने bureau of Indian standards (BIS) चे मानकांनुसार असलेले हेल्मेट भारतात दुचाकी गाड्यांसाठी तयार केले जावेत आणि विकले जावेत असे निर्देश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने २०१८ साली दिलेल्या निर्देशानुसार लायटर हेल्मेट वापरले जावेत हे सुरक्षेसाठी गरजेचे असल्याचे म्हटले होते. तसेच सरकारकडून लहान मुलांना गाडीवरून घेऊन जाताना त्यांनाही हेल्मेट असणे बंधनकारक केले आहे. वेगपण ४० पेक्षा जास्त नसावा. तसेच हे नियम पाळले नाहीत तर हजार रुपयांचा दंड आहे. वरून ३ महिन्यांसाठी ड्रायव्हिंग लायसन्स पण रद्द केले जाईल.

