अबू बक्र अल बगदादी आपल्या बळींना मारण्यापूर्वी भगवे कपडे घालायला लावायचा, हे कनेक्शन चक्क अमेरिकन होतं!

लिस्टिकल
अबू बक्र अल बगदादी आपल्या बळींना मारण्यापूर्वी भगवे कपडे घालायला लावायचा, हे कनेक्शन चक्क अमेरिकन होतं!

जगाला सुखद धक्का बसण्याचे क्षण तसे फारच कमी येतात. असाच तो एक प्रसंग होता. अमेरिकेचे डॉनल्ड ट्रम्प पत्रकार परिषदेत काहीएक महत्त्वाची घोषणा करणार होते. जमलेल्यांचे चेहरे उत्सुकतेने फुलून गेलेले. फार वेळ न ताणता ट्रम्प महाशयांनी घोषित केलं : "काल रात्री 'ऑपरेशन कायला म्युलर' दरम्यान आयसिसचा म्होरक्या अबू बक्र अल बगदादी हा मृत्युमुखी पडला. तिथे सापडलेल्या काही अवशेषांच्या डीएनएवरून तो अबू बगदादी असल्याचे सिद्ध झाले आहे." खरोखर ब्रेकिंग न्यूज होती ही. माणसं मारण्याची फॅक्टरी असलेल्या आयसिस या दहशतवादी संघटनेचा तितकाच क्रूर म्होरक्या मरणं ही जगासाठी एक गुड न्यूजच होती.

बगदादीचा जन्म उत्तर बगदादमध्ये झाला. धर्म आणि फुटबॉल हे त्याचे आवडते विषय. बगदाद या शहरावरून त्याने स्वतःच्या नावापुढे बगदादी लावायला सुरुवात केली. तरुणपणातच तो दहशतवादी कारवाया करणाऱ्या 'सलाफी जिहादिस्ट इन्सर्जन्सी' या गटाशी जोडला गेला. सलाफी म्हणजे मूळ मुसलमान, इस्लामच्या मूळ तत्त्वांचं पालन करणारा मुसलमान. त्या काळात इराकमध्ये अशा छोट्या गटांचं पेव फुटलं होतं. याच काळात अमेरिकेने इराकमधलं सद्दाम हुसेन सरकार बरखास्त केलं होतं आणि इराकमध्ये बॉम्बहल्ले सुरू केले. सद्दामच्या अटकेनंतर इराकमध्ये राजकीय आणि अन्य बाबतीतही अनागोंदी माजली होती. अमेरिकेनं त्यावेळेला दहशतवादाच्या आरोपाखाली अनेकांना अटक केली होती. बगदादी हा यातलाच एक. पण तो तितका धोकादायक दहशतवादी नाही असं म्हणत त्याला वर्षभराच्या आतच मुक्त करण्यात आलं. ही सुटका म्हणजे बगदादीसाठी सुवर्णसंधीच ठरली. असाही तो कट्टर होताच. त्यात त्याने २०१० मध्ये 'सुन्नी एक्सट्रीमिस्ट' नावाच्या अतिरेकी गटावर नियंत्रण मिळवलं. पुढे त्यांनी या गटाला 'इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड लेव्हंट' अर्थात 'आयसिल' हे नाव दिलं.

इराकमधे जिथे जिथे अनागोंदी, गोंधळ, अव्यवस्था आहे अशा ठिकाणी सामर्थ्य वाढवायला संधी आहे हे बगदादीच्या लक्षात आलं आणि त्याने त्या दिशेने हालचाल करायला सुरुवात केली. सर्व प्रथम त्याने आपलं लक्ष सीरियाकडे वळवलं. सीरियातील अनेक प्रदेशांवर कब्जा मिळवला. यावेळी त्याने या संघटनेचे नाव बदलून ते आयसिस असं केलं. हे करत असताना जगभरातल्या मुस्लिमांना स्वतःच्या आधिपत्याखाली आणण्याचा त्याचा मनसुबा होता. पुढे आयसिसने इरकमधल्या मॉसूल शहरातल्या 'द ग्रेट मॉस्क ऑफ अल नुरी' या मशिदीवर कब्जा केला. यावेळी केलेल्या भाषणात त्याने स्वतःला जगभरातील मुस्लिमांचा खलिफा म्हणून घोषित केलं. यापुढे सर्व मुस्लिमांनी फक्त त्याचं ऐकावं असंही त्यांनी सांगितलं. मात्र त्याच्या आवाहनाला फार कुणी भीक घालेना. पण शांत बसेल तो बगदादी कसला? त्यानेही जास्तीत जास्त भाग स्वतःच्या अंमलाखाली आणण्यासाठी कंबर कसली. त्यासाठी त्याने बळाचा वापर केला. आपल्या ताब्यातल्या शत्रूच्या लोकांना मारतानाचा व्हिडिओ शूट करून तो व्हायरल करण्याचं तंत्र आयसिसने अवलंबलं. त्यांच्या त्या व्हिडीओ शूटिंगमध्ये अजून एक पॅटर्न दिसायचा. लोकांना मारण्याआधी त्यांना भगवे कपडे घातले जायचे. बगदादी आणि हा रंग यांचा संबंध तो अमेरिकेच्या कैदेत असताना पासूनचा होता. त्यावेळी अमेरिकेत कैद्यांसाठी भगव्या रंगाचे कपडे असत, त्यामुळे बगदादीलाही तेच कपडे मिळाले. पुढे लोकांना मारताना त्याने या रंगावर भरपूर भर दिला. लोक घाबरले. आयसिसची ताकद काय आहे हे त्यांच्या हळूहळू लक्षात येऊ लागलं. केवळ लष्करी बाबतीतच नव्हे, तर आर्थिक बाबतीतही आयसीसी ताकद मोठी होती. सीरिया आणि इराकमधल्या मोठ्या भूभागावर तेव्हा आयसिसने कब्जा केला होता. त्यामुळे या भागातल्या तेलाच्या खाणी त्यांच्या ताब्यात आल्या. कच्च्या तेलाचा व्यापार करून आयसिस चांगलीच श्रीमंत बनली. तिचा प्रभाव वाढू लागला. जगभरासाठी धोक्याची घंटा वाजू लागली. बगदादी अमेरिकन सैन्याच्या निशाण्यावर आला. त्यातून एका मिशनची सुरुवात झाली: आयसिसचा प्रभाव कमी करणं.

 ट्रम्प लगोलग कामाला लागले. यासाठी 'ऑपरेशन कायला म्युलर' नावाची मोहीम राबवली गेली. यातच अबू बगदादी त्याच्या तीन मुलांसह आणि अन्य साथीदारांसह मारला गेला. या ऑपरेशनच्या नावाची गोष्टही तितकीच इंटरेस्टिंग आहे. या ऑपरेशनला जिचं नाव देण्यात आलं, ती कायला म्युलर ही एक अमेरिकन सोशल ऍक्टिव्हिस्ट होती. आफ्रिका, मध्यपूर्वेतील देशांमध्ये तिने लहान मुलांच्या प्रश्नांवर आणि इतर विषयांवर काम केलं होतं. आयसिसच्या लोकांनी तिचं अपहरण करून तिच्यावर अनन्वित अत्याचार केले. यात बगदादी आघाडीवर होता. या अत्याचारांनंतर तिला अतिशय वाईट प्रकारे ठार मारण्यात आलं. तिच्या मृत्यूचा बदला म्हणूनच की काय अमेरिकेने हे ऑपरेशन यशस्वीपणे पूर्ण केलं. ऑपरेशनदरम्यान बगदादीचा ठावठिकाणा अमेरिकन सिक्युरिटी एजंट्सना मिळाला होता. त्यांना मिळालेल्या माहितीनुसार तो सीरियामधल्या बरीशा नावाच्या गावात भूमिगत बनून राहिला होता. बगदादी राहत असलेल्या ठिकाणी छापे घातले गेले. त्याने स्वतःच्या सुटकेसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, पण सुटकेचे सगळे मार्ग बंद झाल्याचे लक्षात येताच त्याने स्वतःच्या अंगावरील अतिसंहारक शस्त्रांनी भरलेल्या जॅकेटचा स्फोट घडवून आणला. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की तिथे असलेली एक छोटी टेकडी पण त्यात नेस्तनाबूत झाली.

बगदादी तर मेला. पण म्हणून आयसिस नष्ट होणार नाही. अनेकांच्या मते बगदादीच्या जागी दुसरा कोणीतरी येईल. एखाद्या झाडाला कीड लागल्यावर नुसती कीड लागलेली फांदी काढून टाकून उपयोग नसतो. त्यासाठी मुळावरच घाव घालावा लागतो. अल कायदा, आयसिस यांसारख्या दहशतवादी संघटनांनाही हेच तत्त्व लागू पडतं. एकटा बगदादी जाऊन आयसिस नष्ट होणार नाही. त्यासाठी त्याच्या मुळावरच घाव घातला गेला पाहिजे. नाही का?

स्मिता जोगळेकर