८५ वर्षांच्या निवृत्त शिक्षकाने पक्षी आश्रम स्थापन केला.वाचा यातून ते कुणाकुणाला कशी मदत करत आहेत!!

लिस्टिकल
८५ वर्षांच्या निवृत्त शिक्षकाने पक्षी आश्रम स्थापन केला.वाचा यातून ते कुणाकुणाला कशी मदत करत आहेत!!

निवृत्तीनंतरचे आयुष्य कसे असावे याची तजवीज अनेक नोकरदार करत असतात. प्रत्येकाच्या रुचीप्रमाणे निवृत्तीनंतरचे नियोजन बदलत असते. काही नातवंडांमध्ये रमतात, काही गावाकडे राहायला जातात, तर काही लोक आयुष्यभर काम केले आता थोडा आराम करावा या मानसिकतेतून आराम शोधत असतात. अर्थातच, कुठल्याही प्रकारचे आयुष्य जगणे काही गैर नाही.

आपल्याकडे असेही काही नोकरदार आहेत, ज्यांच्या निवृत्तीनंतरच्या कामाचीसुद्धा सर्वच स्तरावरुन दखल घेतली गेली. गुजरातच्या रामटेकडी परिसरात राहणारे रामजीभाई मकवाना यांची कहाणी ऐकली तर कुणालाही आदर्श घ्यावा असेच वाटेल.

रामजीभाई मकवाना सरकारी शाळेत शिक्षक म्हणून काम करत होते. निवृत्त झाल्यावर त्यांनी अशा क्षेत्रात काम करायचे ठरवले ज्यात त्यांना आयुष्यभर आवड होती. आयुष्यभर जोपासलेल्या पक्षीप्रेमापोटी त्यांनी पक्षांसाठी एका प्रकारचे अभयारण्यच बनवले. पक्षीतीर्थ आश्रम या नावाने त्यांनी एक आश्रम उभारला. या आश्रमात पक्षी आणि इतरही गरजूंची मदत केली जात असते.

या आश्रमात पक्षांच्या खाण्यापिण्याची विविध क्लृप्त्या लढवून भन्नाट सोय करण्यात आली आहे. त्यामुळे जवळजवळ १५०० पक्षी इथे अन्नपाण्याच्या आशेने येतात. इतके आवडीचे काम असल्यावर रामजीभाईंना सुट्टी घेण्याची पण गरज पडत नाही. रोज सकाळी सर्व तयारी झाल्यावर या आश्रमातील खाण्यापिण्यासाठी लावलेल्या डब्ब्यांत अन्न आणि पाणी टाकण्याचे काम ते करतात.

रामजीभाई सकाळ झाली की गावातून प्रभातफेरी काढतात. घरोघर फिरून ते लोकांकडून जुने डब्बे गोळा करून घेतात. त्यांच्या प्रभातफेरीची लोकांना चांगलीच सवय झाली आहे. लोक स्वतःहून आता त्यांची वाट पाहतात आणि अन्न दान करतात.

\या पक्षी आश्रमात पक्ष्यांची विविधता आहे. मोर, कबुतर तसेच इतरही अनेक पक्षांची चिवचिव रोजची झाली आहे. हा सर्व सुंदर प्रकार बघून आश्रमात आता पर्यटनही वाढीला लागले आहे. दूरदूर वरून लोक आता पक्षीतीर्थ आश्रम बघायला येतात. रामजी भाई आणि त्यांच्या पत्नी आश्रमात राहतात. इथे त्यानी भरपूर वृक्षलागवड केली आहे. परिणामी इथले वातावरण तजेलदार आहे.

पशु पक्षांसोबत गरजू लोकांना मदत करण्यातही रामजीभाई मागे नाहीत. आपली पेन्शन ते सर्वसामान्य लोकांच्या अडचणी सोडविण्यासाठी खर्च करतात. वयाच्या ८५ व्या वर्षी अशाप्रकारे पर्यावरण पूरक आणि सामाजिक बांधीलकी जपणारे कार्य केल्यामुळे त्यांचा पूर्ण भागात मोठा आदर केला जात आहे.

रामजीभाई आणि त्यांच्या पक्षी तीर्थ आश्रमबद्दल इतरही ठिकाणी माहिती प्रसिद्ध होत आहे. रामजीभाई यांनी दाखवून दिले आहे की समाजासाठी काही करण्यासाठी खूप जास्त संसाधने असावीत असे काही नसते. छोट्या गोष्टींमधून पण मोठा बदल घडून येऊ शकतो.

उदय पाटील