१५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेन्द्र मोदींनी राष्ट्राला उद्देशून केलेले भाषण बलुचीस्तानाच्या उल्लेखाने चर्चेचा विषय झाले आहे. ह्या बलुचीस्तानी मिरचीचा ठसका पाकिस्तानला जोरात लागला आहे. आंतरराष्ट्रीय शिष्टाचार जगताला हे अनपेक्षित होते. हा प्रखर राष्ट्रवादाचा जागर आहे की भारताच्या धोरण बदलाचा संकेत आहे या बद्दल अनेक चर्चा होत आहेत. गेली अनेक वर्षे आपण दहशतवादाला मर्यादेत ठेवण्यात सफल झालेलो आहोत. गेल्या काही महिन्यातील दहशतवादी हल्ले (उदाहरणार्थ : पठाणकोट हल्ला) सहनशक्तीच्या मर्यादाना आव्हान देणार्या आहेत. इतर अनेक देशांचा प्रत्यक्ष ताबा अतिरेकी आणि दहशतवादाकडे आहे तसे आपल्या देशात होणे शक्य नाही. याचे श्रेय अर्थातच सशक्त लोकशाही कडे जाते. ज्या देशात सशक्त लोकशाहीचा अभाव आहे किंवा लष्करी लोकशाही आहे तेथे दहशत वाद फोफावला आहे. पाकिस्तान दहशतवादाला पोसून भारताच्या सीमेत ढकलतो आहे हे सत्य वारंवार भारताने जगासमोर मांडले आहे. या सहनशीलतेला लोकशाहीचे दौर्बल्य समजू नये असा आशय पंतप्रधानांच्या भाषणात आहे. या पार्श्वभूमीवर जर कालचे भाषण ऐकले तर हा भारताच्या धोरण बदलाचा संकेत वाटतो आहे. संरक्षणाचा बचावात्मक पवित्रा बदलून भारताने आक्रमक बचावाकडे वाटचाल सुरु केली आहे असा संदेश पाकीस्तानाला मोदींनी दिला आहे. हा संकेत अर्थातच शक्य तितका सौम्य आहे. असा बदल किती तीव्र स्वरुपाचा होऊ शकतो याची झलक गेल्या वर्षी अजित डोवाल यानी दिलेल्या भाषणाची चित्रफीत बघितली तरच कळेल. पंतप्रधानांचे भाषण सगळ्यांनी दूरदर्शनवर बघतलेच असेल. आज आपण अजित डोवाल यांचे भाषण ऐकू या.
