राजकारणी वर्तुळात रामटेक बंगल्याचा उल्लेख भयपट स्पेशालिस्ट रामसे बंधूंच्या "पुरानी हवेली" सारखा व्हायला लागला आहे. मुळात बहुसंख्य राजकारणी बाबा बंगाली-शकुन अपशकुन-लकी पेंडंट- अनलकी चप्पल असल्या थोतांडावर विश्वास ठेवणारी जमात असते. रामटेक या नावाची न्युमरॉलॉजी तर अनुकूल आहे असे बरेच राजकारणी सांगतात पण या बंगल्याची लक्षणे मात्र विपरित आहेत. जो या बंगल्यात राहिला तो राम राम म्हणतच बंगल्याबाहेर पडला.
असा आहे रामटेकचा इतिहास.....

१. सुरुवातीला रामटेकवर विलासराव देशमुख राहत होते. याच बंगल्यावर त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीचे वाईट दिवस बघितले. पुढे जाऊन त्यांचे ‘अच्छे दिन’ आले पण तो पर्यंत रामटेक हातचा गेला होता.
२. विलासराव देशमुख नंतर गोपीनाथ मुंडेंच्या हाती रामटेक लागला त्यावेळी ते उपमुख्यमंत्री होते. पण रामटेकवर येताच काही दिवसात अण्णा हजारेंनी त्यांच्या विरोधात मोर्चा काढला आणि त्यांच्यावर करप्शनचे चार्जेस लागले.
३. त्यानंतर बंगला ‘छगन भुजबळ’ यांच्या हाती आला. छगन भुजबळांबद्दल आता आणखी काय सांगणार? महाराष्ट्र सदन घोटाळा आणि बऱ्याच आरोपांखाली सध्या ते जेलमध्ये आहेत. या आधी ते तेलगी प्रकरणात अडकले होते आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला होता.
४. शेवटी बंगला एकनाथ खडसेंच्या पुढ्यात येऊन पडला पण मंत्रीपदाची २ वर्ष पूर्ण करण्याआधीच त्यांना सर्व मंत्रीपदांचा राजीनामा द्यावा लागला.
एकंदरीत पाहता रामटेकवर जो आला त्याला आपल्या राजकीय कारकिर्दीला राम राम म्हणावं लागलं असंच दिसतं. जर "मेघदूत" या नाटकाचा तपशील बघितला तर रामटेकवर वास्तव्य होते एका शापित यक्षाचे, कदाचित त्यामुळे सगळ्याच रामटेकवर राहणार्यांना शापाला सामोरे जावे लागते का काय ते देव जाणे!!
मराठीत एखाद्याचा "कात्रज करणे " असा वाक्यप्रचार आहे. त्या यादीत मुख्यमंत्र्यांनी एका नव्या वाक्यप्रचाराची भर टाकली आहे तो म्हणजे एखाद्याचा "रामटेक" करणे.

