उत्तर प्रदेशात विकृतीचा कळस-बलात्काराच्या व्हिडिओंची सर्रास विक्री.

उत्तर प्रदेशात विकृतीचा कळस-बलात्काराच्या  व्हिडिओंची सर्रास विक्री.

आजकाल उत्तर प्रदेशातल्या बलात्काराच्या बातम्या पेपरमध्ये नाहीत असा दिवस मिळणं मुश्किल झालंय. नवर्‍यासमोर बायको-मुलीवर झालेल्या बलात्काराच्या बातमीपाठीपोठ एका शिक्षिकेवरती बलात्कार झाल्याच्या बातम्या येऊन धडकल्या आहेत. हे कमी की काय म्हणून उत्तर प्रदेशात आणखी पुढच्या पायरीच्या विकृतीची लाट उसळलीय.

बलात्कार करून त्या बलात्काराची चित्रफीत विकण्याचा गलिच्छ धंदा सध्या  तिथे शहरोशहरी बोकाळलाय. काही सेकंद ते काही मिनिटांच्या या व्हिडीओंची किंमत प्रत्येकी ५० ते १५० रुपये घेतली जातेय. ओळख असलेल्या ग्राहकाला (?) किंवा ओळखीचा हवाला देणार्‍याला काही मिनिटात असे व्हिडिओ फोनद्वारे दिले जातात. व्हिडिओवर चित्रित बीभत्सतेच्या प्रमाणात किंमत आकारली जाते. एका व्हिडिओत एका मुलीला चार जणांनी जखडून ठेवले आहे आणि तिच्या मित्राला मारहाण चालू आहे. पिडित मुलगी कळवळून बोलते आहे की "कृपया शूटींग तरी करू नका". अशा व्हडिओला अर्थातच विकृत गिर्‍हाइके जास्त पैसे मोजायला तयार असतात. बलात्कार , बलात्काराचे चित्रिकरण , तो व्हिडीओ ऑनलाइन टाकण्याची धमकी आणि धमकीचे शस्त्र वापरून पुन्हा /वारंवार बलात्कार असे समीकरण सध्या उत्तर प्रदेशात वापरलं जातंय.

या सर्व प्रकाराची माहिती पोलीसांना आहे पण .....हा उत्तर प्रदेश आहे.