ऑलिंपिक्स सुरू होण्यापूर्वी यात सोहळ्यात असणार्या खेळांची माहिती वाचूया:
ऑलिंपिक २०१६: बोभाटा ऑलिंपिक गाइड भाग 5 (संपुर्ण)


व्हॉलिबॉल(Volleyball)
१८९५ मध्ये विल्यम्स जी. मॉर्गन याने 'मिन्टोनेट' (mintonette) नावाने एक खेळ सुरू केला होता. त्याचा उद्देश होता की हा YMCA जिममध्ये वयस्क लोकांना बास्केटबॉलला पर्याय म्हणून खेळायला आवडेल. एका शतकात या खेळाचे स्वरूप बदलत हा ऑलिंपिकमधील अत्यंत चुरशीचा आणि भरपूर लोकप्रिय असा खेळ झाला आहे.
भारतासह बहुतांश देशांमध्ये बऱ्यापैकी खेळल्या जाणाऱ्या या खेळात एकूण दोन सुवर्णपदके पणाला लागलेली असतात. एक पुरूष संघाचे व एक महिला संघाचे. सहाजणांच्या संघात खेळल्या जाणाऱ्या या खेळाचे नियम बहुपरिचित आहेत.
ऑलिंपिकमध्ये या स्पर्धा पूल पद्धतीने खेळवल्या जातील. १२ संघांना दोन सहा संघांच्या गटांमध्ये विभागले आहे. त्यातील सर्वोत्तम आठ संघ उप-उपांत्य, उपांत्य स्पर्धाखेळातील. उपांत्य फेरीतील विजेते सुवर्णपदकासाठी तर उपांत्य फेरीतील पराभूत ब्रॉन्झ पदकासाठी लढतील.
यावेळी भारताकडून कोण?
अपात्र/संघ उपलब्ध नाही
यावेळी भारताला पदकाची आशा?
गैरलागू

वॉटर पोलो(Water Polo)
१९०० पासूनच्या प्रत्येक ऑलिंपिक्समध्ये खेळल्या गेलेल्या या खेळाविषयी जरा विस्ताराने लिहितो.
इथेही बॉलगेम्सप्रमाणे चेंडू गोल-जाळ्यात भिरकावणे व गोलकीपरने तो अडवणे असते. प्रत्येक संघात सात खेळाडू असतात. एक स्पर्धा आठ मिनिटांच्या चार भागांत विभागलेली असते. एका संघाला प्रतिस्पर्ध्यावर गोल करायला केवळ ३० सेकंद असतात नाहीतर बॉल दुसऱ्या संघाकडे जातो. यात कठीण गोष्ट अशी असते की खेळाडूंनापुलच्या कडेला-भिंतींना अथवा तळाला स्पर्श करणे वर्ज्य असते. ज्यामुळे अटीतटीच्या सामन्यात तर एकावेळी स्पर्धक तीन मैल पोहावे इतके हातपाय मारतो. या खेळात कितीही वेळा सबस्टिस्ट्युशन केलेले चालते. मात्र त्यांना पाण्यात एका ठराविक भागातूनच शिरावे व बाहेर पडावे लागते.
एकूणच वेगवान असणारा हा खेळ अत्यंत अटीतटीचा असतो. या स्पर्धेतही महिला व पुरूष अशी दोन सुवर्णपदके पणाला लागलेली असतात
यावेळी भारताकडून कोण?
अपात्र/संघ उपलब्ध नाही
यावेळी भारताला पदकाची आशा?
गैरलागू

भारोत्तोलन (Weightlifting)
एकूण १५ सुवर्णपदके देऊ शकणार्या या खेळाविषयी गेल्या काही वर्षात भारतात जागृती होत आहे. हा क्रीडाप्रकार अतिशय पुरातन आहे. अत्यंत सोप्या पद्धतीने समजवायचंतर जास्तीत जास्त वजन उचलणार तो जिंकणार या पद्धतीचा हा खेळ आहे. अर्थातच वजन उचलणं हे तुमच्या शरीराच्या वजनाशी संबंधीत असतं तेव्हा विविध वजनी गटातस्पर्धा घेतल्या जातात. ऑलिंपिक्समध्ये महिला व पुरूष मिळून १५ वजनी गटात स्पर्धा होतील.
यात प्रत्येक स्पर्धकाला दोन प्रकाराने वजन उचलायचे असते. स्नॅच पद्धतीमध्ये एकाच फटक्यात जमिनीवरून डोक्याच्यावर (हात वर-सरळ) वजन उचलून दाखवायचे असते.तर 'क्लीन अँड जर्क' पद्धतीत हे वजन दोन टप्प्यात उचलले जाते. पहिल्या टप्प्यात खांद्यावर आणि मग डोक्यावर एक जर्क देऊन उचलले जाते. या दोन्ही प्रकारात तीन संधी मिळतात. दोन्ही प्रकारातील सर्वोत्तम खेळीची बेरीज केली जाते व एकूण जास्तीत जास्त वजन उचलणारा स्पर्धक विजयी ठरतो.
यावेळी भारताकडून कोण?
पुरुष ७७ किलो गट: सतीश शिवलिंगम् (राष्ट्रकुल सुवर्ण)
महिला ४८ किलो गटः साईखोम चानु (राष्ट्रकुल रजत)
यावेळी भारताला पदकाची आशा?
माझ्यामते यंदा भारताला या खेळात पदक मिळण्याची आशा धरता येऊ नये.

कुस्ती (Wrestling)
जगातील सर्वात पुरातन खेळांपैकी एक समजला जाणार्या या खेळाचा कैफ महाराष्ट्रासाठी - भारतासाठीदेखील नवा नाही ख्रि.पू ७०८ मध्ये जुन्या ऑलिंपिक्समध्येदेखील हा खेळ खेळला गेला होता. भारताचे पहिले वैयक्तिक पदक 'खाशाबा जाधव' याने याच खेळात मिळवल्याचे अनेकांना पाठ झाले असेल. मात्र आपल्याकडे खेळली जाणारी लाल मातीतली कुस्ती आणि इथे चटईवर खेळली जाणारी कुस्ती यात कमालीचा फरक आहे. तंत्र, फिटनेस, पकडी इत्यादी अनेक बाबतीत चटईवर खेळताना बदल करावे लागतात.
ऑलिंपिक्समध्ये दोन प्रकारची कुस्ती खेळली जाईल ग्रीको रोमन आणि फ्रीस्टाईल. ग्रीको रोमन कुस्तीमध्ये केवळ कमरेच्या वरच्या भागाचा वापर करता येतो तर फ्रीस्टाईल कुस्तीमध्ये असे कोणतेही बंधन नाही. प्रतिस्पर्ध्याची पाठ टेकल्यास तो तिथल्या तिथे हरतो. अन्यथा दोन मिनिटांच्या तीन फेर्या होतात व विविध पेचांना दिलेल्या गुणावरून विजेता ठरतो. या स्पर्धांमध्ये दोन मिनिटे हा किती मोठा वेळ आहे याचा उत्तम प्रत्यय येतो.
यंदा ७ पदके पुरूष ग्रीको रोमन, ७ पदके पुरूष फ्रीस्टाईल आणि ४ पदके महिलांच्या कुस्तीसाठी अशी एकूण १८ सुवर्णपदके पणाला असतील
यावेळी भारताकडून कोण?
यावेळी भारतातर्फे तब्बल आठ खेळाडू (गेल्यावेळी चार) पात्र ठरले आहेतः
पुरुष फ्रीस्टाईल
संदिप तोमर - ५७ किलो
योगेश्वर दत्त - ६५ किलो
प्रवीण राणा - ७४ किलो (आधी इथे नरसिंग यादव पात्र ठरला होता. डोपिंग टेस्ट पोझिटिव्ह आल्याने प्रवीण राणाचा नंबर लागला)
पुरुष ग्रीको रोमनः
रविंद्र खत्री - ८५ किलो
हरदीप सिंग - ९८ किलो
महिला फ्रीस्टाईलः
विनेश फोगट - ४८ किलो
बबिता कुमारी ५३ किलो
साक्षी कुमारी - ५८ किलो
यावेळी भारताला पदकाची आशा?
यंद सुशीलही नाही किंवा नरसिंगही नाही. मात्र संदिप आणि योगेश्वर कडून पदकाची अपेक्षा करता यावी. महिलांमध्येही बबिता कुमारीने मोठा उलटफेर करत पदक पटकावल्यास आश्व्हर्य वाटू नये
ही लेखमालिका इथे संपत आहे. फुटबॉल सामने तर कालपासूनच सुरू झाले असले तरी ऑलिंपिक्सचा अधिकृत उद्घाटन सोहळा उद्या आहे. बोभाटाच्या वाचकांसाठी आम्ही अजूनही काही माहितीपूर्ण गोष्टी, ऑलिंपिक्सच्या बातम्या, व्हिडीयो तर एखाद्या खेळाचे लाईव्ह अपडेट्सही घेऊन येणार आहोत. तेव्हा सतत बोभाटाच्या ऑलिंपिक विभागात डोकावत रहा आणि घरबसल्या रियोमधील बित्तंबातमी मिळवा.
हॅप्पी ऑलिंपिक्स! होऊद्या भारताचा बोभाटा!!