वर्ष : सप्टेंबर २००३ ते जुलै २००४.
स्थळ : दक्षिण कोरियाची राजधानी सेऊल.
हे संपूर्ण वर्ष पोलिसांच्या सहनशक्तीची परीक्षा पाहणारं ठरलं होतं. अवघं पोलीसदल चिंतामग्न होतं. त्यांच्या चिंतेचं कारण होतं क्रूरपणे हत्या करणारा यू यंग चूल नावाचा माथेफिरू. सप्टेंबर २००३ ते जुलै २००४ या काळात यू ने अनेक लोकांची हत्या केली होती. त्याचं लक्ष्य होतं श्रीमंत व्यक्ती आणि महिला. श्रीमंत 'सावज' हेरायचं, लपतछपत त्यांच्या आलिशान घरांमध्ये शिरायचं आणि घरातल्या लोकांना मारून टाकायचं अशी त्याची पद्धत होती. याशिवाय तो वेश्यांना त्याच्या घरी बोलावून घेऊन बाथरूममध्ये त्यांचा खेळ खलास करायचा. दहा महिने त्याने खून करण्याचा सपाटा लावला होता. त्यामुळे पोलीस पुरते गोंधळून गेले होते. त्यांच्यावर मात करणारा हा माणूस होता तरी कोण? त्याचा ठावठिकाणा काय होता? हे प्रश्न त्यांना छळत होते. याच प्रश्नांची उत्तरं देणारी ही क्राईम स्टोरी. दक्षिण कोरियाचा रेनकोट किलर या नावाने (कु)प्रसिद्ध असलेल्या यू यंग चूल नावाच्या सीरियल किलरची गोष्ट.






