रिटायरमेंटच्या दिवशी रक्ताने माखलेली कॅप घालणारा पोलीस अधिकारी!! यामागची कहाणी काय आहे?

लिस्टिकल
रिटायरमेंटच्या दिवशी रक्ताने माखलेली कॅप घालणारा पोलीस अधिकारी!! यामागची कहाणी काय आहे?

प्रत्येकाच्या आयुष्यात निवृत्तीचा अर्थात रिटायरमेंटचा दिवस विशेष असतो. त्या व्यक्तीने आजवर केलेलं काम, त्या निमित्ताने अनुभवलेले कडूगोड क्षण, मिळालेले मानसन्मान या सगळ्याचा या दिवशी लेखाजोखा मांडला जातो. अशाच एका आगळ्यावेगळ्या निरोपसमारंभाची आणि त्यासाठी कारणीभूत ठरलेल्या पोलीस अधिकाऱ्याची गोष्ट.

ही गोष्ट आहे आयपीएस ऑफिसर प्रतीप फिलिप यांची. ३० सप्टेंबर रोजी ते रिटायर झाले. पण या रिटायरमेंटच्या कार्यक्रमातली अनोखी बाब म्हणजे त्या दिवशी त्यांनी परिधान केलेली कॅप आणि बिल्ला. या दोन्ही वस्तू त्यांच्या लेखी अनमोल आहेत. त्यांना त्यांच्या कारकिर्दीच्या इतिहासात एक वेगळा अर्थ आहे.

ही कॅप २१ मे १९९१ रोजी राजीव गांधींना ठार मारण्यासाठी झालेल्या बॉम्बस्फोटादरम्यान रक्ताने माखली होती. या महाभयंकर स्फोटाने तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्यासह अनेकांचा बळी घेतला होता. त्यात फिलिप गंभीर जखमी झाले होते. स्फोटानंतर सीबीआयने त्यांची रक्ताने माखलेली कॅप आणि बिल्ला या दोन गोष्टी पुरावा म्हणून गोळा केल्या होत्या आणि गेली तीस वर्षं त्या सीबीआयच्या ताब्यात होत्या. निवृत्तीच्या आधी प्रतीप फिलिप यांनी फर्स्ट ॲडिशनल सेशन्स कोर्टात एक याचिका दाखल केली. त्यावर निकाल देताना कोर्टाने त्यांना त्यांच्या रिटायरमेंटच्या दिवशी ती कॅप आणि नावाचा बिल्ला घालण्याची परवानगी दिली. त्यासाठी १ लाख रुपयांचा बॉंड लिहून घेण्यात आला. २८ ऑक्टोबरपर्यंत या दोन्ही गोष्टी त्यांना कोर्टाला परत करायच्या आहेत.

प्रतीप फिलिप हे १९८७ च्या बॅचचे अधिकारी. त्या दिवशी झालेल्या बॉम्बस्फोटाच्या आठवणी अजूनही त्यांच्या अंगावर काटा आणतात. ते दृश्य म्हणजे जणू नरक होता. तिथे असलेल्या रेड कार्पेटला आग लागली होती. स्वतः राजीव गांधींचा मृतदेह पूर्णपणे छिन्नविच्छिन्न अवस्थेत पालथा पडला होता. फिलिप यांचाही संपूर्ण चेहरा रक्ताने माखलेला होता, हात फ्रॅक्चर झाला होता आणि जवळपास शंभरेक धातूचे छर्रे त्यांच्या शरीरात घुसले होते. वास्तविक बॉम्बस्फोटामुळे उडालेला धातूचा एक तुकडादेखील जीव घ्यायला पुरेसा असतो. या पार्श्वभूमीवर शंभर छर्रे अंगात शिरूनही फिलीप जिवंत राहिले हा चमत्कारच आहे. त्यानंतर ते दीर्घकाळ हॉस्पिटलमध्ये होते. तो संपूर्ण काळ शारीरिक आणि मानसिक यातनांचा होता. वैद्यकीय मदत मिळाल्यानंतर जवळपास वर्षभराने ते नोकरीत रुजू झाले.

फिलिप यांच्यासाठी ती रक्ताने माखलेली कॅप आणि बिल्ला हा केवळ त्यांच्या पोशाखाचा भाग नाही, तर मृत्यूच्या दाढेतून सुरक्षितपणे ते बाहेर आले त्यावेळच्या प्रसंगाची ही स्मृतिचिन्हं आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी त्या दोन गोष्टींचं मूल्य अनमोल आहे. या वस्तू आपल्या कारकिर्दीत एकदातरी आपल्याला अंगावर चढवायला मिळाव्यात यासाठी त्यांनी तब्बल तीस वर्षं वाट पाहिली आहे. २००३ मध्ये उत्कृष्ट सेवेबद्दल पंतप्रधानांच्या हस्ते झालेला सत्कार आणि २०१२ मध्ये मिळालेलं राष्ट्रपती पदक यांपेक्षाही जणू या वस्तू मौल्यवान आहेत. ही गोष्ट घडली त्यावेळी ते एएसपी म्हणजेच असिस्टंट सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस होते. त्यामुळे त्या बिल्ल्यावर अजूनही तो जुनाच हुद्दा आहे. पण म्हणून त्याचं महत्त्व कमी होत नाही.

विशेष म्हणजे मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर येण्याची फिलिप यांची ही पहिलीच वेळ नव्हती. याआधीही त्यांनी एकदा हाच अनुभव घेतलेला आहे. त्यावेळी ते तरुण होते आणि ट्रेनी आयपीएस ऑफिसर होते. तुतिकोरीन जवळच्या कोरल आयलंडपाशी ते मित्रांबरोबर सुट्टीचा आनंद घेत असताना समुद्राच्या एका लाटेबरोबर ते वाहून जाऊ लागले. त्यावेळी त्यांचे बॉस आणि तत्कालीन पोलीस अधीक्षक असलेल्या अधिकाऱ्यांनी त्यांना कृत्रिम श्वासोच्छवास देऊन वाचवलं होतं. दोन वेळा मृत्यूच्या अगदी जवळ जाऊन परत आलेल्या या अधिकाऱ्याच्या विचारसरणीला आध्यात्मिक आणि चिंतनशील बैठक आहे. त्यातूनच त्यांनी स्वतः तयार केलेल्या ३३३३ वचनांचं एक पुस्तक बनवलं आहे. ही सर्व वचनं मोटिव्हेशनल कोट्स आहेत आणि या पुस्तकाचे शीर्षक आहे “Fillipisms - 3333 Maxims to Maximize your life”

त्यांनी केलेलं अजून एक उल्लेखनीय काम म्हणजे फ्रेंड्स ऑफ पुलिस हा उपक्रम. सामान्य लोक योग्य प्रशिक्षण दिल्यास आणीबाणीच्या वेळी पोलिसांना मदत करू शकतात आणि अनेकांचे प्राण वाचू शकतात, हे त्यांनी स्वतः अनुभवलं होतं. राजीव गांधींच्या हत्येच्या वेळी ते स्वतः गंभीर जखमी होऊन रस्त्यात कोसळले होते तेव्हा 'कॉमन' पब्लिक मधल्या अशाच काही सज्जनांनी त्यांना मदत केली होती. त्यांनाच नाही तर इतर जखमींनाही केली होती. 'आम आदमी'ची ही क्षमता लक्षात घेत त्यांनी तिला एक चांगलं वळण द्यायचा प्रयत्न केला आहे. आजही या उपक्रमामुळे अनेकांना योग्य ती मदत मिळाली आहे.

स्मिता जोगळेकर