इजिप्त हा आफ्रिका खंडातला एक मुस्लिमबहुल देश. या देशाची ८० टक्के लोकसंख्या मुस्लिम आहे. इजिप्शियन संस्कृती जगातल्या अत्यंत प्राचीन संस्कृतींपैकी एक मानली जाते. दुसऱ्या महायुद्धापर्यंत इतर अनेक देशांप्रमाणे इजिप्त ही ब्रिटिश वसाहत होती. महायुद्धानंतर ब्रिटिशांनी इजिप्तवरचा ताबा सोडला. त्यानंतर काही वर्षांनी गमाल नासर हे सत्तेवर आले. अन्वर सादत हे गमाल नासर यांचे एक साथीदार.
अन्वर सादत आणि गमाल अब्दुल नासर हे ब्रिटनमध्ये एकत्र शिकले होते. ब्रिटनमधून शिकून परतल्यानंतर सादत यांनी काही काळ नासर यांच्याबरोबर कामही केलं. या मैत्रीचा सादत यांना राजकीयदृष्ट्या बराच फायदा झाला. नासर जेव्हा इजिप्तचे अध्यक्ष बनले तेव्हा उपराष्ट्रपती म्हणून अन्वर सादत यांची वर्णी लागली. नासर इजिप्शियन जनतेच्या दृष्टीने देव होते. अमेरिकेसारख्या बलाढ्य शक्तीपुढेही ते कधी झुकले नाहीत. त्यांची ताकद प्रचंड होती आणि तितकीच जनमानसावरची पकडही पक्की होती.






