" उत्तर कोरियाकडे हायड्रोजन बॉम्ब बनवण्याची क्षमता आहे " ही जानेवारी २०१६ ची बातमी जगातल्या अनेक देशांनी हसण्यावारी नेली. आणि काल उत्तर कोरियाने हायड्रोजन बॉम्बचा स्फोट करून हसणारांचे दात घशात घातले. उत्तर कोरियासारख्या देशात कुठून आली ही ताकद? ज्या तंत्रज्ञानावर मूठभर देशांची मिरासदारी आहे ते कोरियाकडे आले कसे? आजपर्यंत कोरियाने अनेक अणू चाचण्या केल्या पण कालच्या हायड्रोजन बॉम्बच्या चाचणीने अमेरिका का हादरली आहे?? सगळ्यांच्याच मनात असे अनेक प्रश्न आहेत आणि त्यांची उत्तरे आज आपण जाणून घेऊया!!
कोरियाला अणुइंधन दिले कोणी?
युरेनियम २३५ - प्लुटोनियम यासारखं अणूइंधन सहजासहजी मिळत नाही. हायड्रोजन बॉम्बसाठी किरणोत्सर्गी लिथियमची गरज असते. कोरियाकडे युरेनियमच्या स्वत:च्या खाणी आहेत. म्हणजे अर्धी समस्या इथंच संपली. १९६५ साली त्यांची पहिली अणुभट्टी सोव्हिएट रशियाच्या मदतीनं सुरु झाली होती. अण्वस्त्रं तयार करण्याची सुरुवात मात्र १९८० नंतर झाली.

सध्या कोरियाकडे किती अण्वस्त्रे असतील?
आजच्या तारखेस साठ अण्वस्त्रे तयार असतील असा आंतरराष्ट्रीय समूहाचा अंदाज आहे . कोरिया मात्र यांपेक्षा अधिक प्रमाणात साठा असल्याचा दावा करतो.
तसं पाहता, अशी अण्वस्त्रं असणारा उत्तर कोरिया हा काही एकमेव देश नाहीय. मग यांच्याचकडे असलेल्या अण्वस्त्रांचा इतका गवगवा का केला जातो?
तर, सर्व अण्वस्त्रधारी राष्ट्रांचा एक समझोता आहे. त्यामुळं ही अस्त्रे वापरली जाण्याची शक्यता फार कमी आहे. कोरिया या समूहात नाही. दुसरा मोठा धोका असा आहे की कोरियाची सर्व सत्ता एका माणसाच्या हातात एकवटलेली आहे. एकदा का त्याची सटकली, की काय होईल हे तो ही सांगू शकायचा नाही.
जर कोरिया वाळीत टाकलेला देश आहे तर हे तंत्रज्ञान कोरियाला कसं मिळालं??
या तंत्रज्ञानाचा मुख्य स्त्रोत आलाय हेरगिरीतून. इतर प्रगत देशातून शिकून आलेले विद्यार्थी, मूळ देश सोडून आश्रयाला आलेले इतर देशाचे नागरिक आणि पाकिस्तानसारख्या देशांची छुपी मदत यांतून कोरिया आजवर बरंच काही करू शकलाय्.
अण्वस्त्रं तयार करणे आणि हजारो किलोमीटर अंतरावर असलेल्या देशावर ती डागणं यात कोरियाची प्रगती कितपत आहे?
२८ ऑगस्ट रोजी जपानच्या दिशेनं मिसाईलचा मारा करून कोरियाने आपली क्षमता आधीच सिद्ध केलीय. Hwasong-14 या कोरियाच्या मिसाईलचा पल्ला १०४१० किलोमीटरचा आहे. म्हणजे अमेरिकेच्या पूर्व भागात कोरिया कधीही हल्ला करू शकतो. अल-जझीरा या चॅनेलनं हे तंत्रज्ञान भारतानं पुरवल्याचा आरोप केला होता. पण तो दावा सिध्द करण्यासाठी दिलेली लिंक आता अस्तित्वात नाही .

इतकी माहिती असताना कालच्या हायड्रोजन बॉम्बचा इतका धसका जगाला का बसला आहे ?
हायड्रोजन बॉम्ब आणि इतर अणुबॉम्ब यांच्या क्षमतेत मोठा फरक आहे. नागासाकी हिरोशिमावरवर टाकलेल्या बॉम्बच्या शंभर पट क्षमता एका हायड्रोजन बॉम्बमध्ये असते. त्यातही भर म्हणजे, जे इतर अणुबॉम्ब बनवण्याच्या तंत्रापेक्षा वेगळ्या असणाऱ्या हायड्रोजन बॉम्ब बनवण्याच्या तंत्राची मिरासदारी फ़क्त मोजक्या देशांकडे होती, ती संपल्याचं काल सिध्द झालंय.
आता पुढं काय ?
हा यक्षप्रश्न आहे. याला डेविल्स आल्टर्नेटिव्ह म्हणजेच सैतानाचा पर्याय असं म्हणता येईल. पण काही आशियाई देशांच्या सहकार्याने मार्ग निघेल अशी आशा आहे .
