फुलझाडं करतात परागकणांचं रेशनिंग...

फुलझाडं करतात परागकणांचं रेशनिंग...

फुलझाडं आणि मधमाशा यांच्यात एक वेगळंच नातं असतं. आपल्या परागकणांच्या प्रसारासाठी झाडांना मधमाशा लागतात  पण परागकण तयार करण्यासाठी झाडांना खूप ऊर्जाही लागते. आता परागकण तयार करण्यामगचे श्रम पाहिले, तर त्याच-त्याच मधमशांना हे परागकण मिळाले, तर त्यांचा चांगला प्रसार होणारच नाही. मग या झाडांना प्रत्येक मधमाशीमागे परागकणांचं रेशनिंग करावं लागतं.

परागकण काही मोजक्या मधमाशांच्या फेर्‍यांमधूनच संपू नयेत यासाठी फुलझाडं काय करतात याचं शास्त्रज्ञांना अनेक वर्ष कोडं होतं. हल्लीच झालेल्या यासंबंधीच्या एका प्रयोगानंतर शास्त्रज्ञांनी असा निष्कर्ष काढला की यासाठी फुलझाडं विशिष्ट चवीचे परागकण तयार करत असण्याची शक्यता आहे. या प्रयोगात शास्त्रज्ञांनी फुलांमधील परागकणांना कृत्रिमरित्या चव दिली. त्यांनी काहींना सुक्रोजने गोड, क्विनाईनने कडू आणि सेल्युलोजने चवहीन बनवलं आणि त्यांना बंबलबी मधमाश्यांच्या सहा वसाहतींच्या संपर्कात आणलं. पहिल्या पाच मिनिटांमध्येच मधमाशांनी सर्वात जास्त धाव, गोड परागकणांकडे घेतली. ते क्विनाईनच्या तिप्पट प्रमाणात होतं. सर्वात कमी आकर्षण चवहीन परागकणांकडे असूनही ते गोड परागकणांच्या इतकेच उचलले गेले होते.

शास्त्रज्ञ आता फुलझाडं, परागकणांची चव कशी नियमित ठेवतात, याची माहिती मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत.