अमेरिकेतील पेनिसिल्व्हानियामध्ये एक असं शहर आहे, जिथं ना मोठी उद्यानं आहेत, ना नद्या आहेत, न समुद्र किनारा, धबधबा ना एखादं पर्यटन स्थळ ना पुरातन इमारती. तरीही हे शहर पर्यटकांसाठी आकर्षण स्थळ बनलं आहे. काहीच नसलेल्या या शहरात लोकं काय पाहायला येत असतील? तर हे जे काहीच नसणं आहे तेच पाहण्यासाठी इथं पर्यटकांची गर्दी होते. कधी काळी हजारो लोकांची वस्ती असलेलं हे गाव आज अगदी भकास आणि उजाड बनलं आहे. या गावातील हा भकासपणाच पर्यटकांना खुणावत आहे. आम्ही बोलत आहोत, पेनिसिल्व्हानियातील सेन्ट्रालियाबद्दल. कधी काळी गजबजलेलं हे शहर आज उजाड होण्यामागं नेमकी काय करणे असतील? जाणून घ्यायचं आहे? मग हा संपूर्ण लेख नक्की वाचा.
गेली ६० वर्षे आगीत धुमसत असलेले हे गाव ‘घोस्ट टाऊन’ म्हणजे ‘झपाटलेलं गाव’ म्हणून ओळखलं जातं.


कधी काळी म्हणजे सुमारे सहा दशकांपूर्वी हे गाव इथल्या कोळशाच्या खाणीसाठी प्रसिद्ध होतं. आता मात्र हे गाव ‘घोस्ट टाऊन’ म्हणजे ‘झपाटलेलं गाव’ म्हणून ओळखलं जातं. या गावामध्ये नेमकं असं काय घडलं ज्यामुळे या गावातील सर्वच्या सर्व रहिवाशांना आपलं घर सोडून जावं लागलं?
पेनिसिल्व्हानियामधील हे एक छोटेखानी गाव आहे. याची लोकसंख्या कधीकाळी फक्त १५०० होती. या गावात कोळशाचे भले मोठे साठे होते. या कोळशाच्या खाणी हाच या गावकऱ्यांच्या उदार्निवाहाचा स्त्रोत होता. पण १९६२ साली अचानकच गावाच्या बाहेरच्या डम्पिंग ग्राउंडवर आग धुमसू लागली. खरं तर ही आग नेमकी कशामुळे लागली आणि कुठून लागली याचा आजही थांगपत्ता लागलेला नाही. पण हळूहळू ही आग फोफावत गेली आणि संपूर्ण गावच रिकामं करण्याची वेळ आली.
नंतर लक्षात आलं की ही आग जमिनीवर पसरत नसून जमिनी खालील कोळशांच्या खाणीतून पसरत आहे आणि त्यामुळं ती आटोक्यात आणणं दुरापास्त आहे.

अजूनही याठिकाणी धुराचे लोट उठलेले पाहायला मिळतात. आगीतून मोठमोठ्या ज्वाला जरी बाहेर पडत नसल्या तरी इथं उठणाऱ्या धुरामुळे संपूर्ण गावची हवा प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाली आहे. हवेतील या धुराचं आणि विषारी वायूचं प्रमाण वाढल्यानं लोकांच्या आरोग्यावरही याचे गंभीर परिणाम होऊ लागले तेव्हा प्रशासनाने संपूर्ण गावच स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला.
१९६२ साली जेव्हा सुरुवातीला गावाबाहेरच्या डम्पिंग ग्राउंडवर धुराचे लोट दिसू लागले तेव्हा ही आग विझवण्यासाठी प्रशासनाने भरपूर प्रयत्न केले. पण आग काही विझता विझत नव्हती आणि आगीचे मूळही सापडले नाही. १९७९ पर्यंत तरी याकडं कुणी फारशा गांभीर्यानं पहिलं नाही. परंतु १९७९ मध्ये एका गॅस स्टेशनमधील गॅसचं तापमान सामान्य तापमानाच्या वर असल्याचं दिसून आलं. त्यानंतर गावात अचानकच एक १५० फूट खोल भगदाड पडलं. शिवाय गावकऱ्यांना श्वसनाचाही त्रास जाणवू लागला. तेव्हा काही गावकऱ्यांनी स्वतःहूनच गाव सोडण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतरच्या काही वर्षांत तर इथल्या हवेतील विषारी वायूंचं प्रमाण वाढतच गेलं. सध्या तरी या गावामध्ये फक्त पाच रहिवासी आहेत. खरंतर त्यांनीही गाव सोडून सरकारने दिलेल्या जागेवर राहायला जावं अशी त्यांची मनधरणी केली जात आहे, हे नव्वदी पार पोहोचलेल्या या लोकांना आपल्या पूर्वजांचं घर सोडून जाणं जीवावर आलं आहे. प्रशासनालाही या हट्टापुढे हात जोडण्याशिवाय काही पर्याय उरलेला नाही.
गेल्या अनेक वर्षात इथं कुणीच रहिवासी नसल्यानं गावातील अनेक इमारती मोडकळीस आल्या आहेत. काही तर जाणून बुजून पाडण्यात आल्या आहेत. जमिनीतच आग धुमसत असल्यानं गावातील कुठल्याही रस्त्यावर अचानक भगदाड पडू शकतं. इथल्या कित्येक रस्त्यांवर चिरा गेलेल्या आहेत. या चिरांतून धूर बाहेर पडताना दिसतो. ठिकठिकाणी असेच धुरांचे लोट दिसतात. म्हणून इथल्या स्थानिक प्रशासनाने गावात येणारे रस्ते देखील बदलून घेतले आहेत.

संपूर्ण गाव रिकामं झालं असलं तरी आग आटोक्यात आणण्यात यश न मिळाल्यानं, अजूनही प्रशासनाला या गाववार नजर ठेवावी लागते. सुमारे सहा दशकांपूर्वी लागलेली ही आग कधी आटोक्यात येईल की नाही, याचा अंदाजच लागत नाही.
या आगीमुळे इथल्या परिसरात विषारी वायूंचं प्रमाण दिवसेंदिवस अधिकच वाढत चाललं आहे, शिवाय जमिनीला मोठमोठे तडे जात आहेत ते वेगळंच.
कधी काळी सोन्याची अंडी देणारी कोंबडी अशी ज्या गावाची ख्याती होती तेच गाव आता ‘झपाटलेलं गाव’ म्हणून ओळखलं जातं.
किती तो विरोधाभास!
मेघश्री श्रेष्ठी