सर्जरीच्या क्षेत्रात सहसा पुरूषांचाच अधिक दबदबा असतो. या अशा क्षेत्रात चेन्नईच्या डॉ. टी. एस. (तंजावर सनतकृष्णा) कनका आपला पाय रोवून उभ्या आहेत. त्या आहेत आशिया खंडातल्या पहिल्या न्यूरोसर्जन. फक्त आशिया खंडातल्याच नाही, तर जगातल्या पहिल्या काही स्त्री-न्यूरोसर्जन्सपैकी त्या एक आहेत.
१९३२ साली चेन्नई इथं जन्मलेल्या डॉ. कनकांना १९६६मध्ये त्यांना ’एशियन वुमन्स न्युरोसर्जिकल असोसिएशन’चे मानद अध्यक्षपद बहाल करण्यात आले होते. तेव्हा डॉ. कनकांना ’पहिल्या आशियाई न्यूरोसर्जन’ या किताबाने गौरवण्यात आले. आताशा त्या रिटायर झाल्या असल्या तरी त्या अजूनही आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांना आरोग्यदायी सेवा मिळाव्यात म्हणून निरनिराळ्या संस्थांसोबत काम करतात. सर्वाधिकवेळा रक्तदान करणारी व्यक्ती म्हणूनही त्यांचे नांव लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंदले गेले आहे.
डॉ. कनका सध्या भारतीय बायोमेडिकल इंजिनिअर्स सोबत मेंदूला उत्तेजित करण्याच्या प्रोजेक्टवर काम करत आहेत.
