एप्रिलचा शेवटचा आठवडा जगभरातील खगोल प्रेमींसाठी सर्वाधिक खास ठरणार आहे. शुक्र, मंगळ, गुरू आणि शनि या चार ग्रहांचे दुर्मिळ संयोग या महिन्यात होण्याची अपेक्षा आहे. हे ग्रह एकमेकांपासून खूप दूर असले तरी ते एका सरळ रेषेत असल्यासारखे दिसतील. हे सर्व एका ग्रह विशिष्ट स्थानावर असतील. आणि फक्त हेच नाही, तर विशेष म्हणजे आणखी दोन ग्रह - बुध आणि युरेनस या वर्षाच्या शेवटी संरेखनात ( म्हणजे या सरळ रेषेत) सामील होण्याची अपेक्षा आहे. हा दुर्मिळ योग म्हणजे सर्व खगोल प्रेमींसाठी एक पर्वणीच आहे.
नासानुसार ही दुर्मिळ घटना अजून विशेष असेल. कारण दुर्बिणी किंवा इतर पाहण्याचे साधन न वापरता फक्त डोळ्यानाही दिसू शकेल. आकाश ढगाळ नसेल तर हा अनुभव सगळ्यांनाच घेता येईल.
नासाच्या वेबसाइटनुसार एप्रिलच्या सुरुवातीला, शुक्र, मंगळ आणि शनि सूर्योदयापूर्वी आग्नेय दिशेला एकत्र आले होते. तर शनी दररोज मंगळाच्या दिशेने फिरताना दिसतो. त्यानंतर एप्रिल महिन्याच्या मध्यापर्यंत, गुरू पहाटेच्या पूर्व भागात येऊन या तिघांच्या रेषेत दिसतो. पहाटेच्या वेळेस अश्याप्रकारे शुक्र, मंगळ, गुरु आणि शनि यांचे एका रेषेत दिसणे म्हणजे फार सुंदर अनुभव असणार आहे. असे योगायोग नेहमीच घडत नाहीत. त्यामुळे हा अनुभव घेण्यासाठी सगळ्यांच्या नजरा आकाशाकडे असणार आहेत.