ऑक्टोपस इतर प्राण्यांना जमत नाही अशा काही गोष्टी करू शकतात. त्यांला कोडे सोडवता येते, स्वतःचा आकार-रंग बदलता येतो, त्याला जर बरणीत बंद केले तर बरणीचे झाकण उघडता येते, एवढंच नाही तर त्यांना स्वतःच्या जनुकांमध्ये बदल करता येतो. याहून चकित करणारी गोष्ट म्हणजे ऑक्टोपसच्या प्रत्येक हातांला स्वतःचा मेंदू असतो. आजच्या लेखात आपण जाणून घेणार आहोत ऑक्टोपसचे हात स्वतंत्र विचार कसे करतात..
मेंदूचं कार्य चालवण्याचं काम मज्जातंतूवर असतं. जेवढे जास्त मज्जातंतू तेवढा जास्त मेंदू तल्लख. ऑक्टोपसच्या शरीरात ५० कोटी मज्जातंतू असतात. यातील अर्धे मज्जातंतू त्याच्या हातांमध्ये विभागलेले असतात. त्याच्या प्रत्येक हातामध्ये मज्जातंतू पेशींचा संच असतो. या मज्जातंतू पेशींद्वारे त्यांची हालचाल स्वतंत्रपणे नियंत्रित केली जाते. ऑक्टोपसच्या आठ हातांमध्ये आठ मेंदू असतात असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही.
ऑक्टोपसच्या हातांवर फार पूर्वीपासून संशोधन होत आहे. या संशोधनातून हे सिद्ध झालंय की ऑक्टोपसचा हात शरीरापासून वेगळा केला तरी तो हालचाल करू शकतो, वस्तू पकडू शकतो आणि जरी तोंड शिल्लक नसलं तरी अन्न आपल्या तोंडाच्या दिशेने नेऊ शकतो.
