वाचकांसाठी एक विशेष सूचना : ही हॉलीवूडच्या सिनेमाची कथा नाही.
जेट एअरवेजची फ्लाइट बोईंग ७३७, फ्लाइट 9W-555 . दोहा ते कोचीन.
विमानतळावरची धावपट्टी नजरेस येत नाहीय.
सहा वेळा विमान उतरवण्याचे प्रयत्न निष्फळ झाले आहेत.
आता टाकीत फक्त -फक्त ३४९ किलो इंधन शिल्लक आहे.
आता या सातव्या प्रयत्नात विमान जमिनीवर उतरलं तरच दिडशे प्रवासी आणि कर्मचारी यांचे प्राण वाचतील......
अन्यथा अनर्थ अटळ आहे.
पाचव्या प्रयत्नानंतर "मे डे " कॉल दिला आहे.
सातव्या प्रयत्नाच्या सुरुवातीला cockpit voice recorder (CVR) वर रेकॉर्ड झालेलं कॉकपीटमधलं संभाषण -
फर्स्ट ऑफीसर : " “Do you know where it (runway) is? ” (तुला ती (धावपट्टी) कळली आहे का ?
पायलट : "“Just going blindly,” ( आंधळ्यासारखा जातोय )
विमान आता खूप खाली आलंय. अचानक पायलटने एक पूर्ण गिरकी घेतली.
धोक्याच्या सूचना : "उंचावर जा, वरती जा. जमिन फार जवळ आहे."
वैमानिकानं या इशार्याकडे दुर्लक्ष करत सातवा प्रयत्न पूर्ण केला.
देवाने आणि दैवाने साथ दिली .....
विमान जमिनीवर सुखरुप उतरलं आहे.
वाचताना घाम फुटेल असा हा थरार गेल्या वर्षी १७ ऑगस्ट रोजी थिरुवनंतपूरम विमानतळावर घडला. यानंतर या घटनेची गंभीर दखल घेण्यात येऊन Directorate General of Civil Aviation चा अहवाल सरकारला देण्यात आला.
या नंतरच्या घडामोडीत पायलटची पदावनती करण्यात आली.
"पुरेसं इंधन होते पण खराब हवामानामुळे जे घडले त्यासाठी पायलटचे कसब आणि प्रशिक्षण यावर अवलंबून राहणे भाग होते" असं जेट एअरवेजचं म्हणणं आहे .
एक साधा प्रश्न मनात उभा राहतो तो असा की " विमानाची दिशा बदलून नजिकच्या विमानतळावर विमान का उतरवले नाही " ?
कोचीनच्या जवळ विमान पोहचलं तेव्हा टाकीत ४८४४ किलो इंधन होतं. विमानतळावरच्या आकाशात तिसरी फेरी झाली तेव्हा फक्त २६४४ किलो शिल्ल्क राहीलं होतं आणि जवळच्या दुसर्या विमानतळावर (बंगळूर) पोहचण्यासाठी ३२०६ किलो इंधनाची गरज होती. (बोईंग ७३७ सारखे विमान धावपट्टीवरच २०० किलो इंधन संपवते.)
मग दिडशेहून अधिक जीवांचे रक्षण केले कुणी? या जेट पायलटने की त्या आकाशातल्या पायलटने?
