काश्मिर ही भूमी एका वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणी आहे. आधी म्हटलं तसं इथंही इतिहासात वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या राजवटींनी राज्य केलं. हिंदू, मुघल, शीख, बौद्ध अश्या वेगवेगळ्या राजवटींमध्ये इथे विविध प्रकारची स्थापत्येही उभी राहिली. फाळणीनंतर पाकिस्तानने काश्मिरचा काही भाग गिळल्यावर अर्थातच काही महत्त्वाची स्थापत्ये त्या भागात गेली. तशी अनेक स्थापत्ये आहेत. पण आपण मुख्य तीन इमारतींबद्दल या भागात जाणून घेणार आहोत
या भागात आपण पाकव्याप्त काश्मिरामधल्या आझाद काश्मिर म्हणवल्या जाणार्या भागातल्या अश्याच इमारतींची माहिती करून घेणार आहोत. (पुढील भागात गिलगिट-बाल्टिस्तानातील स्थापत्यांची माहिती करून घेऊयात)
१. शारदा पीठ (शारदा विद्यापीठ)
नमस्ते शारदे देवि काश्मीरपुर-वासिनि । त्वामहं प्रार्थये नित्यं विद्यादानं च देहि मे||
हा श्लोक शाळेत म्हटला जातो म्हणून अनेकांनी पाठ केला असेल. अजूनही काही जण तो नेमाने म्हणत असतील. पण त्यातली ही शारदा देवी आणि काश्मीरचं नातं काय? या प्रश्न कधी पडलाय का तुम्हाला? तर याचा संदर्भ आहे काश्मिरात असलेल्या "शारदा पीठ" या जागेशी. वैदिक परंपरेतील विविध विद्यापीठे अतिशय प्रसिद्ध होती, त्यापैकीच हे शारदा पीठ. सरस्वती अर्थात शारदा देवींचं हे वसतीस्थान समजलं जातं. येथील विद्यापीठ विविध वैदिक शाखा, तत्कालीन आयुर्वेद आणि समाजशास्त्रांच्या अभ्यासासाठी प्रसिद्ध होतं असं म्हटलं जातं.

या विद्यापाठाचा दरारा आणि किर्ती जगभर पसरली होती असेही म्हटले जाते. पुढे ते वेगवेगळ्या राजांच्या अंमलाखाली आले. १४व्या शतकापासून कोणी त्याचा नाश केला नाही मात्र डागडुजीही केली नाही. एकोणीसाव्या शतकात महाराजा गुलाब सिंग यांनी एकदा डागडुजी केल्याचे उल्लेख सापडतात. त्यानंतर मात्र पठाणी टोळ्यांनी या जागेचा कब्जा करेपर्यंत हे ठिकाण वापरात होते.
ही इमारत आता आझाद काश्मिर म्हणवणार्या भागात गेल्यानंतर त्या जागेकडे स्थानिक सरकारने फारसे लक्ष दिले नाही. मात्र त्याची मोडतोडही केली नाही हे खरे.
या मंदीराची सध्याची मोडकळीस आलेली स्थिती ही २००५च्या भयंकर भुकंपानंतर झालेली आहे.
२. लाल किल्ला - मुझफ्फराबाद
दिल्ली आणि आग्र्याव्यतिरिक्त आणखी एक लाल किल्ला बांधला गेला होता. तो होता मुझफ्फराबाद इथे!

काश्मिरातील 'चुक' घराण्यानं या किल्ल्याचं बांधकाम १५५९ ला सुरू केलं. मुघलांपासून धोका ओळखून त्यांनी अतिशय मोक्याच्या जागी हा किल्ला बांधला खरा, पण तो तयार व्हायला आला तोवर ते इतके दुबळे झाले होते की १५८७मध्ये मुघलांनी काश्मिर जिंकलं. त्यानंतर या किल्ल्याचं महत्त्व संपल्याने त्याकडे मुघलांनी फारसं लक्ष दिले नाही.
पुढे १६८६मध्ये स्थानिक बोम्बा जमातीच्या (मात्र मुघल सुलतान) 'सुलतान मुझफ्फर खान' यानी या किल्याच्याजवळ शहर वसवायचं ठरवलं आणि पुन्हा हा किल्ला वापरात आला. हाच तो सुलतान ज्यानं मुझफ्फराबाद वसवले.
या किल्ल्याच्या तीन बाजूला नीलम नदी आहे . जिला पुर्वी किशनगंगा म्हटलं जायचं. शिवाय याचं स्थापत्य अतिशय भक्कम आणि सुंदर आहे.
३. रामकोट किल्ला:
सध्या पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या काश्मिरातील मंगला धरणाला लागून हा रामकोट किल्ला आहे. 'दिना' नावाच्या गावातून तिथे बोटीने जाता येते. फ्रेडरीक ड्र्यु नावाच्या एका प्रवासी संशोधकाच्या मते घग्गर जमातीच्या तोगुलू नावाच्या स्थापत्यकारानं या किल्ल्याची रचना केली आहे.

एका शिवमंदिराच्या भोवती असलेला हा किल्ला अजूनही उत्तम अवस्थेत आहे. २००५च्या भूकंपानंतरही त्या किल्ल्याची मोठी हानी झाल्याचं ऐकिवात नाही. असं म्हणतात की इथल्या शिवमंदीरात ५व्या आणि ९व्या शतकातील वस्तुंचे अवशेषही सापडले आहेत.
इतका हा पुरातन उत्तम तटबंदी असलेला हा किल्ला, सभोवती असलेली झेलम नदी आणि मंगला धरणाचे पाणी, आणि डोंगराच्या टोकावर असलेला हा किल्ला पर्यटकांचा लाडका नसेल तरच नवल!
आता पुढील भागात गिलगिट-बाल्टिस्तानातील स्थापत्यांची माहिती करून घेऊयात..
माहिती आणि चित्रस्रोतः आंतरजाल, विकीपिडीया
