हे डेसिबल आवाजाची तीव्रता किंवा पातळी मोजण्यासाठी वापरतात, पण आपल्या कानाची रचना अशी आहे की तो सर्व प्रकारच्या आवाजांना सारखा प्रतिसाद देत नाही. आपल्या कानाच्या अंतर्भागात गोगलगायीसारखा दिसणारा कॉक्लिया नावाचा भाग असतो. निसर्गात निर्माण होणारे सर्व प्रकारचे आवाज आपल्याला ऐकू येत नाहीत, हे आपण शाळेत शिकलेलो आहोत. ज्या आवाजाची वारंवारता २० हर्ट्झ ते २०,००० हर्ट्झ या रेंजमध्ये असते, तेवढेच आवाज मानवी कान ऐकू शकतो. कॉक्लिया या वारंवारतेमध्ये असलेल्या आवाजांना प्रतिसाद देऊ शकतो. पण २० हर्ट्झ पेक्षा कमी आणि २०,००० हर्ट्झ पेक्षा जास्त वारंवारता असलेल्या आवाजाला प्रतिसाद देऊ शकत नाही.
डेसिबल हे परिमाण शून्यापासून सुरू होतं. शून्य डेसीबेल हा मानवी कान ऐकू शकेल असा सगळ्यात मृदू आवाज. धाप लागल्यावर श्वासोच्छवास करताना जो आवाज येतो तो दहा डेसिबेल इतका असतो, तर सामान्य पट्टीतल्या बोलण्याचा आवाज ६५ डेसिबेलच्या घरात असतो.