आता शहरीकरणामुळे विहिरी नामशेष होण्याच्या मार्गावर असल्या तरी ग्रामीण भागात विहिरी अजूनही जिवंत आहेत. या विहिरीशी निगडित लहानपणी अनेक आठवणी असतात. तिथले पाणी काढणे, त्यात पोहायला शिकणे, उड्या मारणे अश्या कितीतरी गोष्टी आपण केल्या असतील. साधारणतः आपण पाहिलेली विहीर ही किती खोल असते? साधारण ३०फूट, ४० किंवा ६० फूट असू शकते. पण आज आम्ही अशा विहिरीबद्दल सांगणार आहोत जी तब्बल १३० फुटांपेक्षा जास्त खोल आहे. त्या विहिरीचा तळ अजूनतरी कोणाला सापडला नाही. त्या जगप्रसिद्ध विहिरीचे नाव आहे, जेकब विहीर (Jacob's well).
ही विहीर आहे अमेरिकेत. सेंट्रल टेक्ससमध्ये विंबर्ले शहराच्या बाहेर ही विहिर आहे. ही विहिर मुळात नैसर्गिक आहे आणि ती खूप खोलही आहे. अर्थातच हा लोकांचा एक लोकप्रिय डायव्हिंग स्पॉट आहे. अनेक साहसी पोहणारे इथे विहिरीत सूर मारण्याचा आनंद लुटायला येतात. साहजिकच आतापर्यंत अनेकजणांनी इथे जीवही गमावला आहे. खूप जण खाली डुबकी मारल्यावर हरवले आहेत, पण हे ठिकाण कितीही धोकादायक असले तरी दरवर्षी उन्हाळ्यात इथे गर्दी जमतेच जमते. विहिरीत काहीजण पूर्ण स्क्युबा डायव्हिंगची उपकरणे वापरून उतरतात, तर काहीजण तशीच उडी मारतात. इथे सूर मारणे हा तिथला एक लोकप्रिय साहसी खेळ आहे.




