केस पांढरे होणे, सैल पडलेली आणि सुरकुतलेली त्वचा त्यांच्यासारखीच वाढत्या वयाची अजून एक खूण म्हणजे मोतीबिंदूसारख्या डोळ्यांच्या समस्या. वस्तू धूसर दिसणे हे याचे मुख्य लक्षण. हे नक्की कशामुळे होते?
आपल्या डोळ्यांत जेव्हा एखाद्या वस्तूची प्रतिमा तयार होते तेव्हा ती वस्तू डोळ्यांना दिसते. त्यासाठी त्या वस्तूपासून निघालेले किरण कॉर्निया, कॉर्नियामागे असलेले लेन्स आणि शेवटी रेटिना असा प्रवास करतात. रेटिनावर म्हणजे डोळ्यातील पडद्यावर हे किरण आदळतात आणि मेंदूकडे संकेत पाठवले जाऊन आपल्याला वस्तू दिसते. वयोमानानुसार किंवा अन्य काही कारणांनी जेव्हा लेन्सधील तंतू पांढरट होऊ लागतात तेव्हा लेन्स अर्धपारदर्शक बनल्याने किरण डोळ्यांच्या पडद्यापर्यंत पोहोचण्यात अडथळा निर्माण होतो. यामुळे व्यक्तीला धूसर दिसू लागते. पारदर्शक काचेवर अथवा चष्म्यासमोर वाफ साचल्यावर जसे दिसते तशा वस्तू अस्पष्ट दिसू लागतात. या विकाराला मोतीबिंदू म्हणतात.



