आता आला डॉनल्ड ट्रंप नावाचा पतंग!!

आता आला डॉनल्ड ट्रंप नावाचा पतंग!!

सध्या डॉनल्ड ट्रंप हे या ना त्या कारणानं सतत चर्चेत आहेतच. त्यात हा आमचाही खारीचा वाटा..

वर्ष १९९८ मध्ये डॅलिबोर पोव्हलोनी या झेक कीटकतज्ञानं पतंगाची एक नवीनच प्रजात शोधून काढली होती. ती त्याला सापडली होती  कॅलिफोर्नियातल्या सॅन्टा कॅटेलिना बेटावर. त्यासाठी त्यानं  दोन पुल्लिंगी पतंगांचं बराच काळ निरिक्षण केलं होतं. आणि या नवीन प्रजातीला त्यानं नांव  दिलं- निओपाल्पा.

पतंगांच्या या नवीन प्रजातीवर किटकतज्ज्ञांकडून सतत संशोधन सुरू होतं. दरम्यानच्या काळात या पतंगांच्या गुणसूत्रांचा बारकोड निश्चित करण्यात आला. काही दिवसांपूर्वीच या प्रजातीतील मादीचाही शोध लागला. पूर्वी पुरेशी माहिती नसल्यानं या पतंगांच्या प्रजातीला दुसर्‍याच प्रजातीपैकी मानलं जायचं. पण आताच्या एकदम प्रगत अशा गुणसूत्रांच्या बारकोड पद्धतीमुळं आणि या पतंगांच्या शारीरिक गुणांच्या अभ्यासानंतर त्यांच्या निओपाल्पा प्रजातीवर शिक्कामोर्तब झालं.  या पतंगाचं एक वैशिष्ट्य असं की याच्या डोक्यावरच्या पिवळ्याजर्द खवल्यांची रचना अशी आहे की जणू याच्या डोक्यावरची हेअरस्टाईलच असावी. ही केशरचना अमेरिकेचे नवीन अध्यक्ष डॉनल्ड ट्रंप यांच्यासारखी असल्यामुळं या प्रजातीला आता निओपाल्पा डॉनल्डट्रंपी हे नाव शास्त्रज्ञांनी निश्चित केलं आहे.

स्त्रोत

 दक्षिण कॅलिफोर्निया व मॅक्सिकोमध्ये सापडणारा  हा छोटासा कीटक साधारण एक सेन्टीमीटर लांबीचा, रंगाने पिवळसर आणि डोक्याशी गर्द पिवळा रंगाचा आहे. वर्णन ऐकूनच ट्रंप आठवले ना? पण शास्त्रज्ञांचं म्हणणं वेगळं आहे. सध्याचं सगळीकडचं मॉडर्नायझेशन आणि शहरीकरण पाहता,  किटकांची राहण्याची  आणि फिरण्याचीही नैसर्गिक ठिकाणं नष्ट होत आहेत. ट्रंप यांचं नांव या पतंगाला देऊन आपण सरकारचं लक्ष या गोष्टीकडे वेधण्याचा  आपण प्रयत्न करत आहोत असं  त्यांचं म्हणणं आहे.