माणसे आत्महत्या का करतात ? नैराश्यानी ग्रस्त झाल्यावर -मानसिक तोल ढळल्यावर ? त्यांच्या मदतीच्या हाका कुणाच्याही कानावर न पडल्यावर ? त्यांनी केलेल्या चुकांचा मानसीक भार सहन होईनासा झाल्यावर ? की मृत्यु हा एकच तर्कसंगत मार्ग आहे याची खात्री पटल्यावर ?
प्रश्नचिन्हा सोबत वर दिलेली सगळी कारणे खरी आहेत आणि काही वेळा खोटीही वाटतात. आत्महत्या ही निवड नाही तर दु:ख सहन करण्याची ताकद संपण्याचे लक्षण आहे.
कॅन्सर सारख्या रोगाच्या शेवटच्या टप्प्यात वेदना सहन करण्याची शक्ती संपल्यावर केलेली आत्महत्या नातेवाईकांना तर्कसंगत वाटते ती दुखणाईताची सुटका झाली म्हणून की त्यांचीच मानसिक वेदनेतून सुटका झाली म्हणून ?
समजा तुम्ही सत्ताविसाव्या मजल्यावर एकाकी आहात.इमारतीला आग लागली आहे .आगीचे लोळ सव्वीसाव्या मजल्यावरून तुम्हाला गाठण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा प्रसंगी तुम्ही उडी मारली तर ती आत्महत्या की सुटकेचा शेवटचा प्रयत्न ?
आजचे प्रश्न आत्महत्या या विषयावर आहेत.









