विश्वास बसणार नाही पण एकेकाळी टॉमॅटोवर पण खटला भरला गेला होता !

लिस्टिकल
विश्वास बसणार नाही पण एकेकाळी टॉमॅटोवर पण खटला भरला गेला होता !

लाल रंगाचा रसरशीत टोमॅटो पाहिल्यावर कोणाच्या तोंडाला पाणी सुटणार नाही? डाएटिंगचं फॅड असणाऱ्यांचा तर टोमॅटोवर भारी जीव! अगदी पिझ्झा, बर्गरपासून ते रोजच्या भाजी-आमटीमध्येही सामावून जाणारा हा टोमॅटो कधी काळी विषारी समजून खाण्यास वर्ज्य मानले जात होते, असे सांगितल्यास कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे.

१८ व्या शतकात टोमॅटो सारख्या फळालाही लोकांनी कोर्टात खेचलं होतं. या टोमॅटो ट्रायलमध्ये टोमॅटो निर्दोष सिद्ध झाला तेव्हाच सर्वसामान्य लोकांनी त्याला आपल्या आहारात स्थान दिले. पण, टोमॅटो विषारी कसा काय समजला गेला असेल?

त्याकाळात टोमॅटोबद्दल युरोपियन समाजात बरेच गैरसमज रूढ होते. पण, तरीही युरोपियन लोकांच्या गार्डनमध्ये टोमॅटोची रोपे हमखास पाहायला मिळत. कारण हे लालभडक फल विषारी असले तरी दिसायला सुंदर आणि आकर्षक आहे. आज आपण आपल्या अंगणात जशी विविध आकाराची, रंगाची शोभेची झाडे लावतो त्याचप्रमाणे त्याकाळात टोमॅटोचे झाड लावले जाई.

टोमॅटोचे फळ फक्त पाहण्यासाठी आहे, खाण्यासाठी नाही, असा नियमच तिथे रूढ होता. शिवाय टोमॅटोतील टोमॅटाइन हे रसायन अध्यात्मिक प्रगतीत अडथळा निर्माण करते असाही काही धर्मगुरूंचा दावा होता. आपले म्हणणे सिद्ध करण्यासाठी त्यांनी न्यू टेस्टामेंटमधील काही वचनांचा दाखला दिला होता. म्हणूनच सामान्य लोक टोमॅटोपासून चार हात दूरच असत.

१८२० साल उजाडेपर्यंत टोमॅटोबद्दलचे हे गैरसमज असेच फोफावत राहिले. १८२० साली न्यूजर्सीतील सालेम या गावातील कर्नल रोबर्ट गिब्बन जॉन्सन यांनी टोमॅटोबाबतचे हे गैरसमज दूर करण्याचा चंगच बांधला. शेतकऱ्यांनी टोमॅटोची अधिकाधिक शेती करावी म्हणून त्यांनी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवल्या.

टोमॅटोच्या शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी १८०८ साली बाहेरून रोपे मागवली. जास्तीत जास्त मोठा टोमॅटो पिकवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी त्यांनी बक्षिसे ठेवली. ते स्वतः रोज टोमॅटोचे सेवन करत. लोकांना तरी जॉन्सन यांचे हे वागणे मूर्खपणाचेच वाटत होते. रोज रोजच्या अशा टोमॅटो खाण्याने एक दिवस नक्कीच त्यांना काही तरी होईल, असा लोकांमध्ये समज होता.

शेवटी एक दिवस जॉन्सन टोमॅटोनी भरलेली टोपली घेऊन गावाच्या एका चौकात आले आणि त्यांनी टोपलीतील एकेक टोमॅटो खाण्यास सुरुवात केली. इतके टोमॅटो खाल्ल्यावर तरी आता जॉन्सन वाचणार नाहीतच, पण त्यांचे नेमके काय होईल? चक्कर येऊन पडतील की, रक्ताच्या उलट्या होतील? हे पाहण्यासाठी लोक गर्दी करू लागले. भरपूर टोमॅटो खाऊनही जॉन्सनयांना काहीच झाले नाही, हे पाहून लोकांना आश्चर्याचा धक्काच बसला.

जॉन्सन यांच्या या एका कृत्यामुळे लोकांच्या मनातील टोमॅटो बद्दलचा गैरसमज दूर झाला. हळुहळू लोकांनी टोमॅटोचा स्वीकार केला आणि टोमॅटो रोजच्या आहाराचा भाग बनला.
मुळात टोमॅटो विषारी फळ असल्याचा गैरसमज पसरलाच कसा आणि लोकांच्या मानवर याचा इतका प्रभाव कसा पडला? याला श्रीमंत युरोपीयनांची उंची जीवनशैली कारणीभूत होती. त्याकाळी हे श्रीमंत युरोपियन आपला बडेजाव दाखवण्यासाठी पेवटर धातूची भांडी वापरत असत. ही भांडी खूपच महाग होती. मात्र ही भांडी बनवताना त्यात शिशाचा वापर केला जात असे. टोमॅटोचा रस आणि या भांड्यातील शिसे यांची एकमेकांवर प्रक्रिया होऊन त्यातून घातक रसायन तयार होत असे. हे रसायन पोटात गेल्याने लोकांना पोट दुखी, जुलाब, उलट्या, असा त्रास होत होता. तब्येत बिघडल्यानंतर हे लोक जेव्हा डॉक्टरांकडे जात तेव्हा नेहमीप्रमाणे डॉक्टर त्यांना ‘काल रात्री जेवणात काय खाल्ले होते?’ हा प्रश्न विचारीतच. यावर लोकांचे टोमॅटो हे ठरलेले उत्तर होते. त्यावरून डॉक्टरांनी टोमॅटो खाल्ल्यानेच लोकांना असा त्रास होतो असा कयास बांधला आणि त्यांनी टोमॅटो विषारी असल्याचा प्रसार सुरू केला. आता खुद्द डॉक्टरच सांगतात म्हटल्यावर सामान्य लोकांचा त्यावर विश्वास बसणारच ना?

या कर्नलसाहेबांचे धाडसही खरेच. पण टोमॅटो लोकप्रिय करण्यासाठी त्याचा औषधी वापरही कारणीभूत ठरला

१८००साली केचप 'टोमॅटो पिल्स कॅन क्युअर ऑल युअर इल्स' या घोषवाक्यासह विकले जायचे!!

. तरी सुमारे दोन शतके तरी लोकांच्या मनात टोमॅटो बद्दलचा हा गैरसमज दृढ झाला होता. रोबर्ट जॉन्सन यांनी प्रयत्न केले नसते तर आणखी किती काळ लोक याच गैरसमजात राहिले असते कुणास ठाऊक.

मेघश्री श्रेष्ठी