इतिहासात कितीतरी महान व्यक्ती होऊन गेल्या आहेत. यातील कुणाचे काम जास्त चांगले? कुणाचे काम जास्त प्रभावी? अशी आपण तुलना करूच शकत नाही. कारण, प्रत्येकानेच आपापल्या क्षेत्रात आपापल्या परीने प्रामाणिक योगदान दिले आहे. ज्याची फळे आज आपण सर्वचजण चाखत आहोत. सामन्यातील सामान्य व्यक्तीच्या रोजच्या कामामुळेही काही ना काही परिणाम घडून येत असतोच, फक्त आपल्याला त्याची कधी जाणीव होत नाही.
डायमंड मिसुरी येथील मोझेस आणि सुझॅन वॉशिंग्टन या दांपत्याने त्यांच्या घोड्याच्या बदल्यात त्यांच्याकडे मोलकरीण म्हणून काम करणाऱ्या मेरीचे कृश मुल वाचवले. त्याकाळी कृष्णवर्णीय हे गोऱ्यांची गुलामी करण्यासाठीच जन्मलेले असतात असा गैरसमज मोठ्या प्रमाणात रूढ होता. सुझॅन आणि मोझेस यांनी त्या मुलाचा जीव तर वाचवलाच पण त्याला चांगले शिक्षण मिळेल याचीही सोय केली. एका कृष्णवर्णीय मुलासाठी जे काही करता येईल ते त्यांनी केले. त्याला स्वतःचे नावही दिले.




