नवीन राबेली बंगळुरुच्या ट्रॅफिक जाम मध्ये अडकला होता. सभोवतालची वाहतूकीची कोंडी आणि धूराचे प्रदूषण बघितल्यावर नवीनच्या मनात विचार आला की ही सगळी वाहने सौरशक्तीवर चालली तर ? फक्त विचारात अडकून न पडता तो कामाला लागला आणि त्याने बनवली सौरउर्जेवर चालणारी "तेजस" टुक टुक. ’टुक टुक’ म्हणजे? आपली रिक्षा हो!!
यासाठी त्याने Piaggio Ape ची एक रिक्षा घेतली आणि त्या रिक्षाच्या छपरावर सोलार एनर्जी तयार करणारी पॅनेल लावली. ही रिक्षा ताशी १०० किमी वेगाने धावते. या नंतर सात महिन्यांपूर्वी या ’टुकटुक’चा १४,२०० किमीचा प्रवास सुरु झाला इंग्लंडच्या दिशेने!! अकरा देश, २० मोठी शहरे आणि १०० छोट्या गावांना भेटी देत सप्टेंबरच्या गेल्या आठवड्यात नवीन राबेलीची तेजस इंग्लंडला पोहचली. वाहने फक्त डिझेल किंवा पेट्रोलवरच चांगली चालू शकतात या समजाला खोटे ठरवत राबेलीच्या तेजस टुकटुकचा इतका मोठा प्रवास पूर्णपणे प्रदूषणमुक्त झाला.
आपण बघू या तेजसचा चित्रमय प्रवास..






