नवाझुद्दिन सिद्दिकी आज लहानसहान मुलांनापण माहित झालाय. एक अभिनेता म्हणून स्वतःची कोणतीही विशेष ओळख नसताना आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर लोकांच्या मनात जागा मिळवणाऱ्या नवाझुद्दिनने आतापर्यंत अनेक हिट्स दिलेत. पण सद्या हा बडा स्टार आपल्या गावाकडच्या शेतात राबताना दिसतोय...
नवाझुद्दिनने आपले स्वतःचे शेतात काम करतानाचे फोटो फेसबूकवर शेअर केले आहेत. मध्य प्रदेश मधलं बुढाना हे त्याचं गाव. नवाझुद्दिनचं कुटुंब हे आधीपासूनच मोठं जमीनदार कुटुंब आहे. म्हणूनच कदाचित यश पायाशी लोळत असताना आजही तो 'जमिनीवर' आहे. फोटोसोबत त्याने कॅप्शन टाकलाय, "शेतात काम करत आहे. आजकाल हे अवघड जातं, पण मला नेहमीच योगदान द्यायला आवडतं" !! यावर्षी तो कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी गेला होता तेव्हाही त्याने ’नीस’मधल्या शेतकर्यांच्या भेटी घेऊन त्यांची शेताला पाणीपुरवठा करण्याची पद्धत समजावून घेतली होती. एवढंच नाही, नंतर ती इरिगेशन सिस्टिम त्याच्या गावी ’बुढाना’लाही घेऊन आला होता.
साहजिकच नवाझुद्दिनच्या या पैलूमुळं चाहत्यांनी त्याचं भरभरुन कौतुक केलंय. जवळ B.Sc पदवी असतानाही केवळ ड्रामा स्कूल मध्ये अॅडमिशन मिळवण्यासाठी वॉचमनची नोकरी करणारा हा महान कलाकार कदाचित हेच सांगतोय की प्रत्येक प्रखर यशाच्या मागे अंधारामधला संघर्ष लपलेला असतो. आणि तो कधीच विसरायचा नसतो..
