डॉ. रघुराम राजन यांच्यानंतर 'रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण होणार?' याबाबत गेले काही आठवडे बर्याच चर्चा ऐकिवात होत्या. आज संध्याकाळी या सर्व चर्चांना विराम देत सरकारने डॉ. उर्जित पटेल, (जे सध्या डेप्युटी गव्हर्नर आहेत) यांची रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून नेमणूक केल्याचे जाहीर केले आहे. डॉ. उर्जित पटेल यांची वैचारिक बैठक मावळते गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांच्याशी मिळती जुळती आहे. त्यामुळे महागाईशी चार हात करणारे सध्याचे वित्तधोरण पुढेही कार्य करत राहील या विचाराने उद्योग जगताने उर्जित पटेल यांच्या नेमणूकीचे स्वागत केले आहे.
काही दिवसांपूर्वी CPI ( कंझ्युन्मर प्राइस इंडेक्स) चार टक्क्याच्या आसपास ठेवण्याचे धोरण जाहीर केल्यावर राजन यांच्या पश्चातही "राजन धोरण " कायम राहणार हे स्पष्ट झाले होते आणि येणारा गव्हर्नर जागतिक स्तरावर अनुभव असलेला असेल अशी अटकळ होती ती आज पूर्ण झाली आहे.
डॉ. उर्जित पटेल कमिटीच्या शिफारशींमुळे (Expert Committee to Revise and Strengthen the Monetary Policy Framework) उर्जित पटेल हे नाव सतत चर्चेत आहे. महागाई आणि चलन फुगवटा यावर इलाज करताना जुन्या व्होलसेल प्राईस इन्डेक्स ऐवजी कंझ्युन्मर प्राइस इंडेक्सचा मापदंड वापरण्याची कल्पना त्यांचीच. याखेरीज परकीय चलन नियंत्रण, नव्या खाजगी बँकांचे परवाने, मॉनीटरी कमिटीची स्थापना अशा अनेक शिफारशी त्यांनी केल्या होत्या ज्या हळूहळू अंमलात येत आहेत.
डॉ. उर्जित पटेल यांचा एक धावता परिचय करून घेऊ या .
डॉ उर्जित पटेल हे अर्थतज्ञ आहेत. नोकरशहा किंबा बँकर नाहीत. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे झाले. त्यानंतर त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून एमफील केले. १९९० साली येल विद्यापीठातून अर्थशास्त्रात पीएचडी केल्यानंतर इंटरनॅशनल मॉनीटरी फंडमध्ये कार्यरत होते. या दरम्यान त्यांचे काम भारताशी निगडीतच होते. ब्रुकींग्ज या विचारवंताच्या मठीचे ते सिनीअर फेलो आहेत.
१९९५ नंतर भारतात आल्यावर वित्त विभागात त्यांनी अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या. ११ जानेवारी१२०१३ रोजी त्यांची नेमणूक रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून झाली. अनेक वर्षे भारताबाहेर राहूनही ते राजन यांच्याप्रमाणे भारतीय आहेत.
चीनमधील मंदी, ब्रेक्झिटचे परिणाम, पडते तेलाचे भाव , युरोपातील मंदी , अशा वेगवेगळ्या जागतिक अर्थकारण त्रस्त आहे. अशा जागतिक वातावरणात भारताला अचानक येणार्या आर्थिक संकटाला तोड देण्यासाठी सतत सज्ज ठेवणे हे डॉ. उर्जित पटेल यांच्या समोरचे मोठे आव्हान असेल.
डॉ.उर्जित पटेल यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा.
