रविवारच्या पुरवण्या :उत्सव, प्रवाह,संवाद, लोकरंग,सप्तरंग,मंथन ,बहार

रविवारच्या पुरवण्या :उत्सव, प्रवाह,संवाद, लोकरंग,सप्तरंग,मंथन ,बहार

एकेकाळी रविवारच्या पुरवण्या चवीचवीने वाचल्या जायच्या. पुरवणीचे प्रत्येक पान वाचले जायचे. जर काही कारणाने वाचन अर्धवट झाले तर राहीलेली पुरवणी सोमवारी प्रवासात वाचली जायची. आता ,तसे नाही. बातम्या वृत्तपत्रात येईपर्यंत शिळ्या झालेल्या असतात. चर्चा व्हॉट्सअ‍ॅपवर फिरत असतात. दृकश्राव्य माध्यमाने वाचनाची सवय मोडून टाकली आहे. पुरवणीत येणार्‍या सकस लेखांकडे वाचकाचे लक्ष वेधून घ्यावे या हेतूने  वेगवेगळ्या पुरवण्यांमध्ये "चुकवू नये " असे  जे काही असेल त्याचा आढावा आपण घेणार आहोत. 
मंथन,संवाद,प्रवाह,सप्तरंग उत्सव लोकरंग,बहार या सात पुरवण्या आम्ही निवडल्या आहेत. ऑलींपिक , बलुचीस्तान, हे ट्रेडींग विषय सर्वच पुरवण्यांमध्ये आहेत.
पुढारीच्या  "बहार" मध्ये  बांगलादेशच्या वाटेवर बलुचिस्तान हा हेमंत देसाईंचा लेख आणि सोबत त्याच विषयाला स्पर्श करणारा मोदींच्या भाषणाचा अन्वयार्थ आणि वस्तुस्थिती हा लेख जर वाचला तर पुरेसे आहे. 
लोकमतच्या मंथन मध्ये ऑलिंपीक-स्वयंसेवक म्हणून काम करणार्‍या सुलक्षणा वर्‍हाडकर यांची "रिओ डायरी" जरूर वाचावी अशी आहे. दिनकर रायकर यांच्या "बाय लाईन" कॉलममध्ये भुजबळांवरचा लेख "लॉ इन ऑर्डर" हा एकदम ऑर्डर मध्ये आहे. राज्यात कार्यान्वित होणार्‍या सायबर लॅबवरचा दुपानी लेख आठवणीने वाचण्यासारखा आहे.
सकाळची सप्तरंग पुरवणी भरगच्च आहे पण न चुकता उत्तम कांबळ्यांचा "कर्ज फेडायचंय , उघडा दरवाजा " हा अनुभव लक्षात ठेवण्यासारखा आहे.
सामनाच्या उत्सवमध्ये अवयवदानाविषयीची छोटीशी मुलाखत आणि एम इंडीकेटरच्या सचिन टेकेवरचा लेख सोडता बाकी सगळे माफ कॅटेगरीतले लिखाण आहे.
प्रहारच्या प्रवाहात ह.शि. खरातांचा परड्यातला शेवगा आणि चंद्रकांत भोंजाळ यांचा मधुकर तोरडमलांवरचा लेख वगळता बाकी सर्व ठिकठाकच आहे. 
लोकसत्ताची पुरवणी जाहीरातींनी खच्चून भरलेली असते आणि काही लेख अंग चोरून त्यात बसवलेले असतात. "बावनकशी" हा दिनेश गुण्यांचा कॉलम एका वेगळ्या वाटेने चालणारा आहे आणि आवर्जून वाचावासा आहे. युपीएससीच्या तयारीसाठी अडीच लाख पुस्तकांचे ग्रंथालय उभारणार्‍या 'व्रज पटेल' यांची ओळख करून देणारा लेख न चुकवण्यासारखा आहे. 
मटा आणि मटाची पुरवणी वर्षानुवर्षाची सवय म्हणून वाचावी .जाहीरातींची व्याप्ती बघून मटा आपले राहीले नाही याची रुखरुख लागते पण नियम मोडला नाही याचा आनंद मिळतो इतकेच काये ते !!
पुरवण्यांचा आढावा घेणारा हा पहिलाच लेख आहे. आपल्या वाचनात येणार्‍या इतर वृत्तपत्रीय पुरवण्यांमध्ये उल्लेखनिय असे काही असेल तर आम्हाला कॉमेंट्स मध्ये सांगा