व्हाट्सॲप ग्रुपचे ऍडमीन होणे काय सोपे काम नाही. खूप मोठी जोखीम असते यात. एखादा कधी काय वादग्रस्त मेसेज टाकून देतो आणि त्याला कर रे दादा डिलीट म्हणून विनवण्या कराव्या लागतात. कारण काही इश्यू झालाच तर जबाबदारी थेट ऍडमीन रावांवर येऊन पडते.
व्हाट्सॲप ग्रुपचे ऍडमिन व्हायला पण लोक घाबरतात त्याला हेच कारण आहे. पण आता घाबरण्याची गरज उरणार नाही. कारण व्हाट्सॲप एक नवीनच फिचर आणत आहे. ज्यामुळे ऍडमिनला ग्रुपवर आलेला कुठलाही मॅसेज स्वत: डिलीट करण्याचा अधिकार प्राप्त होणार आहे.
याबद्दल कुठलीही अधिकृत घोषणा झालेली नसली तरी मेटा ही व्हाट्सॲपची पालक कंपनी याबद्दल विचार करत आहे. व्हाट्सॲपच्या नव्या बीटा व्हर्जनमध्ये हे फिचर उपलब्ध होऊ शकणार आहे. अँड्रॉइड आणि आयओएस अशा दोन्ही वापरकर्त्यांना हा लाभ होऊ शकेल.
हे फिचर आल्यावर व्हाट्सॲप ग्रुप ऍडमिन कुठलाही मेसेज डिलीट करू शकेल. त्यानंतर ग्रुपवर ' this was deleted by an admin' असे दिसेल. याआधी ऍडमिनला लोकांना ऍड किंवा कमी करण्याव्यतिरिक्त इतर कुठलेही अधिकार नव्हते. सध्याच्या घडीला पण ज्याने मेसेज टाकला त्यालाच तो डिलीट करता येत असे.
अशाप्रकारे ग्रुपवर कुठला मेसेज राहील आणि कुठला डिलीट होईल हे ऍडमिनवर अवलंबून असणार आहे. ऍडमिनला मिळणाऱ्या या अधिकच्या अधिकारांमुळे ऍडमिनची पॉवर वाढेल हे निश्चित आहे. पण नुकतेच मुंबई आणि मद्रास हायकोर्टाने ग्रुपवर येणाऱ्या मेसेजेससाठी ग्रुप ऍडमिन जबाबदार नसल्याचे म्हटले होते. पण तरीही ही गोष्ट चांगलीच म्हणावी लागेल, जेणेकरून ऍडमिनला ग्रुपवर सुसूत्रता ठेवणे सोपे जाईल.
तुम्हाला या नव्या व्हाट्सॲपच्या फिचरबद्दल काय वाटते ते आम्हाला कॉमेंटबॉक्समध्ये कळवा.
उदय पाटील
