इतिहासातील सर्वात विचित्र क्षेत्ररक्षणाचे ६ किस्से!! इथे तर कॉमेंट्रेटर्स आणि क्रिकेटचाहतेही बुचकळ्यात पडले!!

लिस्टिकल
 इतिहासातील सर्वात विचित्र क्षेत्ररक्षणाचे ६ किस्से!! इथे तर कॉमेंट्रेटर्स आणि क्रिकेटचाहतेही बुचकळ्यात पडले!!

क्रिकेट हा खेळ फक्त शरीराने नाही, तर बऱ्याच अंशी डोक्याने खेळायचा खेळ आहे. खेळाडू शरीराने फिट असावेच लागतात तितकेच ते भरपूर कल्पनाशक्ती असणारे असतील तर उत्तम. आता हेच पाहा, एखाद्या फलंदाजाला बाद करण्यासाठी चांगला बॉल टाकणे जितके महत्वाचे आहे तितकेच चांगले क्षेत्ररक्षण लावणेही! फलंदाज कुठल्या बाजूला बॉल मारेल याचा अंदाज घेऊन क्षेत्ररक्षक उभा करावा लागतो. काही फिल्डिंग सेटअप हे धमकावण्यासाठी, काही विकेट घेण्यासाठी, तर काही धावसंख्या मर्यादित करण्यासाठी राबवण्यात येतात. आज आपण क्रिकेट इतिहासातल्या अशा विचित्र फील्ड सेटअपची यादी पाहूयात जी पारंपारिक पद्धतीपेक्षा विचित्र होतीच आणि याची खूप चर्चाही झाली.

१. १९७७ च्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंडच्या मॅचमध्ये डेनिस लिलीने स्लिपमध्ये नऊ क्षेत्ररक्षक ठेवले होते. न्यूझीलंडचा पीटर पेथरिक अकराव्या नंबरला फलंदाजी करायला आला तेव्हा गोलंदाज डेनिस लिलीने त्याला लवकरात लवकर आउट करण्यासाठी असे क्षेत्ररक्षण लावले. या निर्णयावर बरीच चर्चा झाली. यावर गंमतीने असेही म्हणले गेले की लिलील्या त्याच्या एका पुस्तकात हा एक मनोरंजक किस्सा म्हणून टाकण्यासाठी असे क्षेत्ररक्षण लावले गेले होते. ही मॅच ऑस्ट्रेलियाने सहज जिंकली. तेव्हा ग्रेग चॅपेल ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन होता.

२. १९९९ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध झिम्बाब्वेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात सुद्धा असेच विचित्र क्षेत्ररक्षण लावले गेले. ऑस्ट्रेलियाचा डॅमियन फ्लेमिंग झिम्बाब्वेच्या फ्लेमिंग डेव्हिड मुटेंडराला गोलंदाजी करत होता. एकदिवसीय सामन्यात असे क्षेत्ररक्षण पहिल्यांदाच लावले गेले होते. कॅप्टन स्टीव्ह वॉ याने ही युक्ती वापरली. याला umbrella fielding असेही म्हणतात. ऑस्ट्रेलिया ही मॅच जिंकत आली होती. शेवटचे फलंदाज बाद करण्यासाठी ही फिल्डींग लावली गेली होती.

३. २००९ च्या भारताविरुद्धच्या T-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाने पुन्हा असे क्षेत्ररक्षण लावले होते. ॲडम व्होग्सने भारताचा शेवटचा फलंदाज असलेल्या इशांत शर्माला घेरण्यासाठी हे क्षेत्ररक्षण सेटअप केले होते. तेव्हा मायकेल क्लार्क हा ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन होता. ऑस्ट्रेलियाने ही मॅच जिंकली होती. कमेंटटेटरने तेव्हा डेनिस लीलीची आठवण काढल्याचे ऐकायला मिळते.

४. २०१३ मध्ये न्यूझीलंडने इंग्लंडविरुद्ध 'umbrella fielding लावली होती. केन विल्यमसन गोलंदाजी करत आहे आणि इंग्लंडचा मॉन्टी पानेसर हा फलंदाज आहे. पण न्यूझीलंड ही टेस्ट मॅच हरला. या प्रकारच्या क्षेत्ररक्षणाला 'कार्मोडी फिल्डिंग' असेही म्हणतात, त्याचे नाव कीथ कार्मोडी यावरून आले आहे.

५. २०१५मध्ये इंग्लंडमध्ये वूस्टरशरने (Worcestershire)एका सामन्यादरम्यान विकेटकीपरशिवाय क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. पंचांनी यावर आक्षेप घेतला नाही. ही युक्ती प्रभावी ठरली, कारण वूस्टरशरने हा सामना १४ धावांनी जिंकला. हा प्रथम श्रेणीचा क्रिकेट सामना होता.

६. खालील फोटोत तुम्ही पाहिल्यास अजून एक वेगळी फिल्डिंग प्लेसमेंट दिसेल. याला 'यॉर्कशर वॉल' असे म्हणतात. यॉर्कशर हा इंग्लंडचा प्रसिद्ध क्रिकेट क्लब आहे. या प्रकारची फील्ड प्लेसमेंट खूप उपयुक्त असते जेव्हा एखाद्या फलंदाजाला धावा काढण्यापासून रोखायचे असते. यामुळे फलंदाजाला क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू न जाता फार मर्यादित शॉट्स खेळता येतात. आणि समजा अंदाज चुकला तर थेट क्षेत्ररक्षकाच्या हातात बॉल जाऊन तो बाद होऊ शकतो.

क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षणाचे अनेक नियम असूनही गोलंदाज कॅप्टनसह वेगवेगळे प्रयोग करतात. पंचाना नियमानुसार त्यावर आक्षेप घेता येत नाही. कधीकधी अशी युक्ती मॅच जिंकवतेही! तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की कळवा.

शीतल दरंदळे

टॅग्स:

cricket

संबंधित लेख