दागिने, पैसा-अडका, गाड्या, जनावरं, साठवलेली धान्यं, औषध अशा कित्येक वस्तूंची चोरी झाल्याचं तुम्ही ऐकलं असेल. पण भलं मोठं बोईंग विमान चोरीला गेल्याचं तुम्ही कधी ऐकलंय का? विमान अपहरण झाल्याच्या तर कित्येक घटना घडतात, पण चोरीला जाण्याच्या? छे! एवढं मोठं विमान चोरीला जाणं कसं शक्य आहे? तुमचं म्हणणंही खरंच आहे. विमान चोरणं ही वाटते तितकी सोपी गोष्ट निश्चितच नाही. पणहे घडलं आहे हे मात्र नक्की.
९/११चा ट्वीन टॉवरवरच्या हल्ल्याला दोनच वर्षं उलटली होती. दहशतवादी कारवायांना ऊत आलेला होता. सगळीकडे यंत्रणा प्रचंड सतर्क होती आणि तरीही हे विमान अशा वातावरणात चोरीला गेले. ही घटना आहे २५ मे २००३ रोजीची!





