ती तरुणी जिथे उभी होती, त्याच्या बरोब्बर विरुद्ध दिशेला सूर्य उगवला होता, पण इमारती आणि झाडांच्या मागे लपल्यामुळे फक्त त्याचा प्रकाश इथपर्यंत येत होता. तारीख होती २० ऑगस्ट २००७. ब्रिटिश कोलंबियातील जेडेडिया बेटावरील सॅलिश समुद्राच्या किनार्यावर सकाळचे सहा वाजले असावेत. जोराचा वारा सुटल्यामुळे आपले उडणारे केस सारखे करत ती तरुणी माॅर्निंग वाॅक घेत होती. सॅलिश समुद्राच्या किनार्यावर ती तरुणी दररोज फेरफटका मारायला येत असे. समुद्राला ओहोटी असल्यामुळे दूरपर्यंत समुद्राच्या लाटांचा आवाज येत नव्हता, आणि वातावरणात एक प्रकारची शांतता होती.
काही तुरळक सीगल पक्षी सोडले, तर आकाशात फारशी हालचाल दिसत नव्हती. सीगल पक्ष्यांची खासियत म्हणजे ते इतर अनेक पक्ष्यांप्रमाणे स्वतः भक्ष्य पकडत नाहीत, तर तयार भक्ष्याचा शोध घेतात, ज्याला इंग्रजीत स्कॅव्हेंजर म्हणतात. त्यामुळे सीगल पक्षी सहसा खोल पाण्यात डुबकी मारून मासे पकडताना दिसत नाहीत; फारफार तर ते वरच्यावर दिसणारे मासे टिपतात. त्यादिवशीही काही सीगल तिच्या डोक्यावरून उडत भक्ष्याचा शोध घेत होते.





