On This Day: जेव्हा ५४ वर्षानंतर भारतीय संघाने पहिल्यांदाच लॉर्ड्सच्या मैदानावर मिळवला होता विजय, वाचा त्या ऐतिहासिक सामन्याबद्दल...

On This Day: जेव्हा ५४ वर्षानंतर भारतीय संघाने पहिल्यांदाच लॉर्ड्सच्या मैदानावर मिळवला होता विजय, वाचा त्या ऐतिहासिक सामन्याबद्दल...

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात १० जून हा दिवस खूप महत्वाचा मानला जातो. याच दिवशी ३६ वर्षांपूर्वी भारतीय संघाने इंग्लंडमध्ये जाऊन लॉर्ड्सच्या मैदानावर पहिला विजय मिळवला होता. विश्वविजेता कर्णधार कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने १० जून १९८६ रोजी इंग्लंड संघाला ५ गडी राखून पराभूत करत ऐतिहासिक विजय मिळवला होता. क्रिकेटची पंढरी म्हटल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानावर पहिला विजय मिळवण्यासाठी भारतीय संघाला ११ व्या वेळी यश आले होते. (indian team)

या विजयानंतर भारतीय संघाने मागे वळून पाहिले नाही. एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने २०१४ मध्ये लॉर्ड्सच्या मैदानावर विजय मिळवला होता. या सामन्यात भारतीय संघाने ९५ धावांनी विजय मिळवला होता. तर गतवर्षी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या युवा भारतीय संघाने इंग्लंड संघाला लॉर्ड्सच्या मैदानावर १५१ धावांनी पराभूत केले होते. (lords first victory) 

लॉर्ड्सच्या मैदानावर मिळवला होता पहिला ऐतिहासिक विजय..

या सामन्यात कपिल देव (Kapil dev) यांनी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. इंग्लंड संघाकडून प्रथम फलंदाजी करताना ग्राहम गुचने ११४ धावांची खेळी केली होती. या खेळीच्या जोरावर इंग्लंड संघाला पहिल्या डावात २९४ धावा करण्यात यश आले होते. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना चेतन शर्माने (Chetan Sharma)  ५ तर रॉजर बिनीने (Rodger Binny) ३ गडी बाद केले होते. पहिल्या डावात फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला ३४७ धावा करण्यात यश आले होते. भारतीय संघाकडून दिलीप वेंगसरकरने नाबाद १२६ तर मोहिंदर अमरनाथने ६९ धावांची खेळी केली होती. या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने ४७ धावांची महत्वपूर्ण आघाडी घेतली होती.

त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजी करण्यासाठी आलेल्या इंग्लंड संघाचा डाव अवघ्या १८० धावांवर संपुष्टात आला होता. भारतीय संघाला इतिहास रचण्यासाठी अवघ्या १३४ धावांची आवश्यकता होती. या धावांचा पाठलाग करताना ७८ धावसंख्येवर भारतीय संघातील चार फलंदाज माघारी परतले होते. त्यानंतर ११० धावसंख्येवर पाचवा फलंदाज बाद होऊन माघारी परतला. त्यानंतर लॉर्ड्सच्या मैदानावर कपिल देव नावाचं वादळ आले. अवघ्या १० चेंडूंमध्ये ३४ धावा चोपत कपिल देव यांनी भारतीय संघाला सामना जिंकून दिला. या सामन्यात कपिल देवला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. मात्र दिलीप वेंगसरकर या सामन्याचे खरे हिरो ठरले होते.

भारतीय संघाच्या कसोटी क्रिकेटची सुरुवात ही लॉर्ड्सच्या मैदानापासूनच झाली होती. पहिल्याच सामन्यात भारतीय संघाला १५८ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. भारतीय संघाने या मैदानावर सलग ६ सामने गमावले होते. त्यानंतर १९७१ मध्ये भारतीय संघाला सामना ड्रॉ करण्यात यश आले होते. शेवटी १९८६ मध्ये भारतीय संघाला पहिला विजय मिळवण्यात यश आले. भारतीय संघाने लॉर्ड्सच्या मैदानावर आतापर्यंत एकूण १९ सामने खेळले आहेत. ज्यात अवघ्या ३ सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवण्यात यश आले आहे. तर १२ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.