तब्बल ६ वर्षांपूर्वी चिन्नस्वामीच्या क्रिकेट चाहत्यांना श्वास रोखून ठेवणारा सामना पाहायला मिळाला होता. २०१६ टी -२० विश्वचषक स्पर्धेत झालेल्या सामन्यात भारत आणि बांगलादेश हे दोन्ही संघ आमने सामने होते. शेवटच्या चेंडूवर धोनीने रनआऊट करत भारताला विजय मिळवून दिला होता. असाच काहीसा रोमांचक सामना बुधवारी (२ नोव्हेंबर) ॲडीलेडच्या मैदानावर पार पडला. यावेळी रोहित सेनाने थरारक सामन्यात बांगलादेश संघाला ५ धावांनी पराभूत केले आहे.
ॲडीलेडच्या मैदानावर झालेला सामना हा ३ टप्प्यात विभागला गेला. सुरुवातीला भारतीय फलंदाजांनी अप्रतिम फलंदाजी करत सामन्यात मजबूत पक्कड बनवली. त्यानंतर दुसरा टप्पा म्हणजे जेव्हा बांगलादेश संघातील फलंदाज फलंदाजी करण्यासाठी मैदानावर आले. लिटन दासने तुफान फटकेबाजी करत भारतीय गोलंदाजी आक्रमणाची कंबर मोडली. त्याने पावरप्लेच्या षटकांमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र त्यानंतर पाऊस पडला आणि हाच सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला. सामन्यातील तिसऱ्या टप्प्यात भारतीय गोलंदाजांनी जोरदार पुनरागमन केले आणि बांगलादेशी फलंदाजांना एकापाठोपाठ एक पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
या ४ कारणांमुळे भारताने जिंकला सामना...
पावसाने सामना बदलला :
भारतीय संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना बांगलादेश संघाने जोरदार सुरुवात केली होती. लिटन दासने केवळ २१ चेंडूंमध्ये तुफानी अर्धशतक झळकावले होते. त्यावेळी बांगलादेश संघाने एकही फलंदाज न गमावता ७ षटकात ६६ धावा केल्या होत्या. पाऊस पडल्यानंतर बांगलादेश संघ १७ धावांनी पुढे होता. डकवर्थ लुईस नियमानुसार, जर पाऊस थांबला नसता तर बांगलादेश संघ हा सामना जिंकला असता. मात्र पावसाने बाजी पालटली, बांगलादेश संघाला विजयासाठी ९ षटकांमध्ये ८५ धावांची आवश्यकता होती. या धावांचा पाठलाग करताना बांगलादेश संघातील फलंदाज एकापाठोपाठ एक माघारी परतले.
केएल राहुल सह भारतीय संघाचे अप्रतिम क्षेत्ररक्षण :
पाऊस थांबल्यानंतर जेव्हा सामना पुन्हा एकदा सुरू झाला त्यानंतर लगेचच भारतीय संघाच्या दिशेने मोठी संधी धावून आली. डीप मिड विकेट वरून धावत येत असलेल्या केएल राहुलने नॉन स्ट्राईकला थ्रो मारत लिटन दासला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. तर सूर्यकुमार यादवने देखील २ अप्रतिम झेल टिपले.
अर्शदीप,शमी अन् हार्दिकची धारदार गोलंदाजी..
पाऊस पडल्यानंतर भारतीय गोलंदाज जोरदार कामगिरी करत होते. जे गोलंदाज सुरुवातीला महागडे ठरत होते. त्याच गोलंदाजांनी पाऊस पडल्यानंतर बांगलादेशच्या फलंदाजांना बॅकफूटवर टाकले होते. १० व्या षटकात मोहम्मद शमीने ४ धावा खर्च करत १ गडी बाद केला.
त्यानंतर अर्शदीपने १२व्या षटकात अफिफ आणि शाकिबला बाद करत बांगलादेशचे कंबरडे मोडले. या षटकातून फक्त २ धावा आल्या. पुढच्याच षटकात हार्दिकने केवळ ७ धावा दिल्या आणि आणखी २ बळी घेतले. त्यानंतर अखेरच्या षटकात बांगलादेशला विजयासाठी २० धावांची गरज होती. हा सामना भारतीय संघाने ५ धावांनी आपल्या नावावर केला.
या विजयानंतर भारतीय संघाचे सेमी फायनलचे तिकीट जवळजवळ कन्फर्म झाले आहे. भारताचा पुढील सामना झिम्बाब्वे संघाविरुद्ध पार पडणार आहे.
