टी -२० क्रिकेटचा राजा!! रिजवानला पछाडत सूर्या दादा पहिल्या स्थानी विराजमान...

टी -२० क्रिकेटचा राजा!! रिजवानला पछाडत सूर्या दादा पहिल्या स्थानी विराजमान...

भारतीय संघाचा मधक्रमातील फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar yadav) सध्या जोरदार फॉर्ममध्ये आहे. आयसीसी टी -२० विश्वचषक २०२२(icc t20 world cup) स्पर्धेतील आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये त्याने धावांचा पाऊस पाडला आहे. आयसीसीने टी -२० फलंदाजांच्या यादीत तो पहिल्या स्थानी विराजमान झाला आहे. त्याने पाकिस्तानचा फलंदाज मोहम्मद रिजवानला मागे टाकत पहिले स्थान मिळवले आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामना सुरू असताना आयसीसीने आयसीसी टी -२० फलंदाजांची क्रमवारी जाहीर केली आहे. 

आयसीसीने जाहीर केलेल्या टी -२० फलंदाजांच्या क्रमवारीत टॉप -१० मध्ये २ भारतीय फलंदाज आहेत. पहिल्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव आहे. तर भारतीय संघातील प्रमुख फलंदाज विराट कोहली दहाव्या स्थानी आहे.

आयसीसी टी -२० विश्वचषक २०२२ स्पर्धेत १३४ धावा केल्या आहेत. त्याने पाकिस्तान विरुध्द झालेल्या सामन्यात १५, नेदरलँड विरुध्द झालेल्या सामन्यात ५१ आणि दक्षिण आफ्रिकेविरुध्द झालेल्या सामन्यात ६८ धावांची महत्वपूर्ण खेळी केली होती. सध्या तो जोरदार फॉर्ममध्ये आहे. इतकेच नव्हे तर २०२२ मध्ये तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज देखील आहे.

फलंदाजांच्या यादीत २ भारतीय खेळाडूंनी बाजी मारली आहे. मात्र गोलंदाजांच्या यादीत भारतीय गोलंदाजांना स्थान मिळवता आले नाहीये. आयसीसीने जाहीर केलेल्या गोलंदाजांच्या यादीत टॉप -१० गोलंदाजांमध्ये एकही भारतीय गोलंदाज नाही. तर अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत हार्दिक पंड्या तिसऱ्या स्थानी कायम आहे. गोलंदाजांमध्ये राशिद खान आणि अष्टपैलू खेळाडूंमध्ये शाकीब अल हसन सर्वोच्च स्थानी आहेत.