येत्या १६ ऑक्टोबर पासून क्रिकेटचा महासंग्राम म्हणजेच आयसीसी टी -२० विश्वचषक २०२२ स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी सर्व संघ जोरदार मेहनत घेताना दिसून येत आहेत. भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलिया संघाला या स्पर्धेच्या जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. मात्र कोणता संघ बाजी मारणार हे स्पर्धा सुरू झाल्यानंतर आपल्याला समजेल.
तुम्हाला माहीतच असेल की, काही दिवसांपूर्वी आयसीसीने क्रिकेटमधील काही नव्या नियमांची घोषणा केली होती. जे १ ऑक्टोबर पासून लागू करण्यात आले आहेत. आगामी टी -२० विश्वचषक स्पर्धेत देखील या नव्या नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे. या नव्या नियमांचा आयसीसी टी -२० विश्वचषकातील सामन्यांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. चला तर पाहूया असे ४ नियम ज्यामुळे सामन्याच्या निकालावर फरक पडू शकतो.
१) नॉन स्ट्राइकरला धावबाद करण्याचा नियम :
आयसीसीने जाहीर केलेल्या नव्या नियमांनुसार, गोलंदाज गोलंदाजी करत असताना नॉन स्ट्राइकवर असलेला फलंदाज क्रिझच्या बाहेर असेल तर,गोलंदाज त्याला धावबाद करू शकतो. यापूर्वी देखील अनेकदा फलंदाजांना बाद घोषित करण्यात आले आहे. त्यावेळी या कृत्याला मांकडींग असे म्हटले जायचे. काही दिवसांपूर्वी भारतीय महिला संघातील गोलंदाज दीप्ती शर्माने इंग्लंडच्या फलंदाजाला याच प्रकारे बाद केले होते. मात्र तिला धावबाद केल्यानंतर तिला अनेक इंग्लिश क्रिकेटपटूंकडून टीकेचा सामना करावा लागला होता.
२) क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडून अयोग्य हालचाली..
आयसीसीने नव्या नियमांमध्ये बजावून सांगितले आहे की, गोलंदाज चेंडू टाकत असताना कुठलाही क्षेत्ररक्षक अयोग्य हालचाल करू शकत नाही. आपण आंतरराष्ट्रीय क्री क्रिकेटमध्ये अनेकदा पाहिलं आहे की, गोलंदाज गोलंदाजी करत असताना क्षेत्ररक्षक हालचाल करून दुसऱ्या ठिकाणी जातो. त्यामुळे फलंदाज विचलित होऊ शकतो. काही वर्षांपूर्वी पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये झालेल्या वनडे सामन्यात स्टीव्ह स्मिथने देखील असाच काहीसा प्रकार केला होता. त्याला अंदाज आला होता की, फलंदाज कुठल्या दिशेने शॉट खेळणार आहे. त्यामुळे त्याने गोलंदाज गोलंदाजी करत असताना क्षेत्ररक्षणात बदल केला. या घटनेनंतर देखील स्टीव्ह स्मिथ वादाच्या भोवऱ्यात सापडला होता.
३) अतिरिक्त क्षेत्ररक्षक ३० यार्ड सर्कलच्या आत..
आयसीसीने लागू केलेल्या नव्या नियमांमधील सर्वात लक्षणीय बदल म्हणजे, जर कर्णधाराने निर्धारित वेळेच्या आत षटके पूर्ण केली नाही तर अतिरिक्त क्षेत्ररक्षक ३० यार्ड सर्कलच्या आत ठेवावा लागेल. आशिया चषक २०२२ स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात दोन्ही संघातील कर्णधारांना निर्धारित वेळेत षटके पूर्ण करता आली नव्हती. त्यामुळे अतिरिक्त क्षेत्ररक्षक ३० यार्ड सर्कलच्या आत ठेवावा लागला होता.
४) फलंदाज बाद झाल्यास नवीन येणारा फलंदाज घेणार स्ट्राइक..
आयसीसीने आणखी एक मोठा बदल केला आहे तो म्हणजे फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन येणारा फलंदाज स्ट्राइक घेणार. या नियमामुळे आयपीएल स्पर्धेतील अनेक सामान्यांच्या निकालावर फरक पडल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे या नव्या नियमाचा आयसीसी टी -२० विश्वचषक स्पर्धेतील सामन्यांच्या निकालावर देखील फरक पडू शकतो. यापूर्वी फलंदाज झेल बाद होत असताना, स्ट्राइक क्रॉस झाल्यास, नवीन येणारा फलंदाज नॉन स्ट्राइकला जायचा. मात्र आता नवीन येणाऱ्या फलंदाजाला स्ट्राइक घ्यावी लागणार आहे.
तुम्हाला जर क्रिकेटच्या एका नियमात बदल करण्याची संधी मिळाली तर तो नियम कुठला असेल? कमेंट करून नक्की कळवा.
