पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील अंतिम सामना लाहोरच्या गद्दाफी स्टेडियममध्ये सुरू आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी (२३ मार्च) यजमान पाकिस्तान संघाचा डाव अवघ्या २६८ धावांवर संपुष्टात आला. या डावात पाकिस्तान संघाकडून अब्दुल्लाह शफीक आणि अजहर अली यांनी सर्वाधिक धावा केल्या. दरम्यान अजहर अलीच्या नावे एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.
या डावात शफीकने पाकिस्तान संघासाठी ८१ तर अजहर अलीने ७८ धावांचे योगदान दिले. यासह अजहर अलीच्या कसोटी क्रिकेटमध्ये ७ हजार धावा पूर्ण झाल्या आहेत. असा कारनामा करणारा तो पाकिस्तानचा ७ वा फलंदाज ठरला आहे. तर जगातील ५४ वा फलंदाज ठरला आहे.
अजहर अलीने आपल्या कारकीर्दीत एकूण ९४ कसोटी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने ४३.२३ च्या सरासरीने ७००४ धावा केल्या आहेत. तसेच कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना तो ११ वेळेस नाबाद परतला आहे. यासह त्याच्या नावे एकमात्र तिहेरी शतक आणि १९ शतकांची नोंद आहे. यासह अजहरने सलीम मलिक, मिसबाह-उल-हक आणि झहीर अब्बास यांसारख्या दिग्गजांना मागे टाकले आहे. तसेच मोहम्मद युसूफ (७५३०), इंझमाम-उल-हक (८८२९), जावेद मियांदाद (८८३२) आणि युनूस खान (१००९९) हे फलंदाज सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत त्याच्या पुढे आहेत.
