'मेरी झांसी नहीं दूंगी' अशी गर्जना करणारी आणि इंग्रजी सत्तेपुढे न झुकणारी झाशीची राणी तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे. झाशीच्या राणीने इंग्रजांविरोधात केलेल्या बंडामुळे संपूर्ण देशात इंग्रजविरोधी वातावरण निर्माण झाले. पण, त्याही आधी इंग्रजांना धूळ चारणारी एक राणी याच भारतात होऊन गेली. जिने झाशीच्या राणीच्या कैक वर्षे आधी इंग्रजांना आपला हिसका दाखवला होता. या राणीचे नाव होते राणी वेलु नचियार!
इंग्रजी सत्तेविरोधात आवाज उठवणारी आणि इंग्रजांशी पंगा घेणारी भारतातील ही पहिली राणी होती. तामिळनाडूमध्ये आजही राणी वेलु नचियारच्या पराक्रमाच्या गाथा गायल्या जातात. वीरमंगाई (वीरमाता) म्हणून आजही तिथे आदराने तिचा उल्लेख केला जातो.
रामनाड संस्थानचे राजा चेल्लूमुत्थू विजयरागुनाथ सेतूपती आणि राणी स्कंधीमुत्थल या दांपत्याच्या पोटी ३ जानेवारी १७३० रोजी राणी वेलुचा जन्म झाला. वंशाला दिवा हवाच असा दुराग्रह न करता या दांपत्याने आपल्या मुलीलाच आपला उत्तराधिकारी समजून राजशकट हाकण्यासाठी आवश्यक असणारे सगळे ज्ञान तिला दिले. तिच्या शिक्षणाची तजवीज केली. युद्धकलेतही राणी वेलु अगदी निपुण होती. घोडेस्वारी, भालाफेक, तलवारबाजी, धनुर्विद्या अशा बहुतेक युद्धकलात ती पारंगत झाली होती. फ्रेंच, इंग्रजी आणि उर्दू अशा परदेशी भाषाही तिला चांगल्या प्रकारे अवगत होत्या.
शिवगंगाइ राज्याचे राजकुमार मुथूवादुगानाथापेरीया उदैयाथेवार यांच्याशी वयाच्या १६ व्या वर्षी तिचा विवाह झाला. दोघांनाही वेल्लाची नावाची एक मुलगीही झाली. दोन दशके त्यांनी आपल्या राज्यात सुखनैव राज्य केले.


