क्रिकेट इतिहासात चायनामॅन गोलंदाजी करणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर, चायनामॅन गोलंदाजी म्हणजे डाव्या हाताने लेग स्पिन करणारे गोलंदाज. आता पर्यंत अनेक दिग्गज चायनामॅन गोलंदाज होऊन गेले. त्यापैकीच एक दिग्गज म्हणजे ब्रॅड हॉग (Brad Hogg). आपल्या संपूर्ण कारकीर्दीत हा गोलंदाज आपल्या फिरकी गोलंदाजीमुळे चर्चेत राहिला. ब्रॅड हॉगचं मुख्य अस्त्र म्हणजे, गुगली आणि फ्लिपर बॉल. ब्रॅड हॉग गोलंदाजीला आला म्हणजे फलंदाज कन्फ्युज झालाच पाहिजे. जगभरातील दिग्गज फलंदाजांना आपल्या फिरकी गोलंदाजीवर नाचवणारा हा गोलंदाज आधी फलंदाज होता, हे सांगितलं तर नक्कीच तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल.
ब्रॅड हॉग आज आपला ५२ वा वाढदिवस साजरा करतोय. हॉगचा जन्म ६ फेब्रुवारी १९७१ रोजी झाला होता. या खेळाडूने आपल्या प्रथम श्रेणी कारकिर्दीची सुरुवात फलंदाज म्हणून केली होती. तो वेस्टर्न ऑस्ट्रेलिया संघासाठी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळायचा. एकदा तो फलंदाजी सोडून नेट्समध्ये गोलंदाजी करत होता. त्याची गोलंदाजी पाहून, संघाचे प्रशिक्षक भलतेच खुश झाले. इथूनच त्याच्या गोलंदाजी कारकिर्दीची खरी सुरुवात झाली. पुढे ब्रॅड हॉग हा सर्वोत्तम फिरकी गोलंदाजांपैकी एक ठरला.
पदार्पणात हवी तशी कामगिरी करण्यात ठरला अपयशी..
ब्रॅड हॉग २६ ऑगस्ट १९९६ रोजी ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला. तर २ महिन्यांनंतर त्याला कसोटी संघात पदार्पण करण्याची संधी मिळाली. यावेळी विरोधी संघ होता भारत आणि मैदान होतं दिल्लीतील फिरोजशाह कोटला स्टेडियम. भारतीय संघाविरुद्ध झालेल्या या सामन्यात ब्रॅड हॉग हवी तशी कामगिरी करू शकला नाही.
पहिल्या डावात त्याने १७ षटके गोलंदाजी करत ३ निर्धाव षटकांसह ६९ धावा खर्च केल्या आणि केवळ एक गडी बाद केला. दुसऱ्या डावात त्याला गोलंदाजी करण्याची संधीच मिळाली नाही. भारतीय संघाने हा सामना ७ गडी राखून आपल्या नावावर केला. हा हॉगच्या क्रिकेट कारकिर्दीतील भारतात खेळलेला एकमेव कसोटी सामना ठरला. आपल्या कारकीर्दीत खेळलेल्या ७ कसोटी सामन्यांपैकी ४ कसोटी सामने हे त्याने भारतीय संघाविरुद्ध खेळले आहेत. या ७ सामन्यांमध्ये त्याला १७ गडी बाद करण्यात यश आले होते.
पोस्टमन बनला क्रिकेटपटू...
दिग्गज फिरकीपटू होण्यापूर्वी ब्रॅड हॉग हा पोस्टमनची नोकरी करायचा. २००३ विश्वचषकावेळी जेव्हा शेन वॉर्नच्या जागी ब्रॅड हॉगची निवड झाली होती. त्यावेळी हॉगने म्हटले होते की, " मी काहीही झालं तरी नोकरी (पोस्टमन) सोडणार नाही. ऑस्ट्रेलियन पोस्टल सर्व्हिसेसने माझी खूप मदत केली आहे. त्यांनी मला स्टेट लेव्हेल सामन्यांसाठी सुट्ट्या दिल्या. तर माझा सराव झाला पाहिजे, त्या अनुषंगाने त्यांनी माझ्या कामाचे नियोजन केले होते."
एकावेळी दोन फिरकीपटूंना गोलंदाजी मिळण्याची शक्यता खूप कमी असते. तसेच संघात शेन वॉर्न सारखा गोलंदाज असेल तर, संधी मिळणं दुरचीच गोष्ट हे. हेच कारण आहे की, ब्रॅड हॉगला अधिक सामने खेळण्याची संधी मिळाली नाही. २००३ विश्वचषक स्पर्धेत शेन वॉर्न बाहेर होता, त्यामुळे ब्रॅड हॉगला संधी मिळाली होती. त्याने अंतिम सामना देखील खेळला आणि विकेट्स देखील काढून दिल्या होत्या. त्याने चांगली कामगिरी करत, मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये आपले स्थान जवळजवळ निश्चित केले होते. त्यानंतर २००७ विश्वचषक स्पर्धेतील विजेत्या ऑस्ट्रेलिया संघात त्याला खेळण्याची संधी मिळाली होती.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर तो सध्या समालोचकाची भूमिका पार पाडताना दिसून येत असतो.
