आजचा दिवस (३१ ऑक्टोबर) हा भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात खास दिवस आहे. कारण आजच्याच दिवशी भारतीय क्रिकेटमध्ये अशा खेळाडूचा उगम झाला, ज्याने भारताला दोन विश्वचषक जिंकून दिले. आम्ही कोणाबद्दल बोलतोय, याची कल्पना तुम्हाला आलीच असेल. आम्ही बोलतोय, भारताला आयसीसी टी -२० विश्र्वचषक २००७ आणि आयसीसी वनडे विश्वचषक २०११ स्पर्धेत विजय मिळवून दिलेल्या कर्णधार एमएस धोनी बद्दल. आजच्याच दिवशी २००५ मध्ये त्याने तुफानी खेळी करत सर्वांनाच आश्चर्यचकित केले होते.
ही गोष्ट २००५ ची आहे. भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये जयपूरच्या मैदानावर वनडे सामना सुरू होता. कुमार संगकारा आणि महेला जयवर्धनेच्या खेळीच्या जोरावर श्रीलंकेने २९८ धावा केल्या होत्या. या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना, भारतीय संघाला हवी तशी सुरुवात करता आली नव्हती. सचिन तेंडुलकर स्वस्तात माघारी परतला होता. त्यानंतर वीरेंद्र सेहवाग आणि धोनीने भारताचा डाव सावरायला सुरुवात केली.
जेव्हा धोनीची बॅट तळपली...
जयपूरच्या मैदानावर एमएस धोनी नावाचं वादळ आलं होतं. या वादळात श्रीलंकेच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई झाली होती. त्यावेळी अनेकांना असे वाटले असेल की, भारताला आता असा फलंदाज मिळाला आहे, जो यष्टिरक्षण करण्यासह तुफान फटकेबाजी देखील करू शकतो. एमएस धोनीने या सामन्यात १४५ चेंडूंमध्ये १५ चौकार आणि १० षटकारांचा मदतीने नाबाद १८३ धावांची खेळी केली होती. हा सामना भारतीय संघाने ६ गडी राखून आपल्या नावावर केला होता.
Vintage and Priceless #WhistlePodu #Yellove @msdhoni pic.twitter.com/fWoylDEUu9
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) October 31, 2022
त्यादिवशी क्रिकेट चाहत्यांना धोनीचे रौद्ररूप पाहायला मिळाले होते. वीरेंद्र सेहवाग बाद झाल्यानंतर देखील, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जात होता. त्याने अवघ्या ८५ चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले. तर १४५ चेंडूंमध्ये १८३ धावांची तुफानी खेळी करत भारतीय संघाला ४ षटक शिल्लक असताना विजय मिळवून दिला.
श्रीलंका संघ जेव्हा भारत दौऱ्यावर आला होता. त्यावेळी ७ वनडे सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसऱ्या सामन्यात एमएस धोनीने आपल्या वनडे कारकिर्दीतील सर्वात मोठी खेळी केली होती. हे शतक पूर्ण केल्यानंतर, एमएस धोनीने गोळी मारण्याचे सेलिब्रेशन केले होते.
