८ फेब्रुवारी १९१४, आजच्याच दिवशी अहमदाबादच्या मैदानावर भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्याला सुरुवात झाली. सामना सुरू होऊन फक्त ६४ मिनिटे झाली होती. घडीचा काटा १० वाजून ४६ मिनिटांवर येताच अचानक आकाशात फुगे उडताना दिसले. मैदानात उपस्थित असलेला एकूण एक प्रेक्षक आश्चर्यचकित झाला होता. नेमकं झालय तरी काय? तर कारण होते कपिल देव. अर्थातच कपिल देव यांनी असा काही पराक्रम केला होता,ज्यामुळे प्रेक्षकांनी त्यांना खास भेट दिली होती.
उडवले गेले ४३२ फुगे..
कपिल देव यांच्या सन्मानार्थ अहमदाबाद क्रिकेट स्टेडियमवर ४३२ फुगे आकाशात उडवले गेले होते. क्रिकेट चाहत्यांनी केलेल्या या कृत्यामुळे सामना काही काळ थांबवण्यात आला होता. चाहत्यांचे प्रेम पाहून कपिल देव यांनी देखील मान खाली घालून चाहत्यांचे आभार मानले. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की, नेमकं काय झालं होतं? तर झाले असे की, या सामन्यात उतरण्यापूर्वी कपिल देव यांनी कसोटी क्रिकेटमध्ये ४३१ गडी बाद केले होते. अहमदाबादच्या मैदानावर झालेल्या सामन्यात एक गडी बाद करताच त्यांनी ४३२ गडी बाद करून रिचर्ड हेडली यांचा विक्रम मोडून काढला होता.
कपिल देव यांनी टाकलेल्या चेंडूवर श्रीलंकेचा फलंदाज हसन तिलकरत्ने शॉट लेगला संजय मांजरेकरच्या हातून झेलबाद झाला होता. भारतीय संघाने हा सामना एक डाव आणि १७ धावांनी विजय मिळवला होता.
मोहम्मद अझरूद्दीनच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या भारतीय संघाने हा सामना जिंकून सलग नववी मालिका आपल्या नावावर केली होती. या मालिकेत भारतीय फिरकी गोलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला होता. भारतीय संघाकडून फिरकीपटू वेंकटपती राजु आणि राजेश चौहानने मिळून २० पैकी १७ फलंदाज बाद केले होते. मार्वन अट्टापट्टु दोन्ही डावांमध्ये शून्यावर बाद होऊन माघारी परतला होता.
कपिल देव यांनी आपल्या संपूर्ण कसोटी कारकिर्दीत एकूण ४३४ गडी बाद केले होते. ते कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत ११ व्या स्थानी आहेत.
